ऑलिंपिक उपविजेत्यांना भारतीय संघाने हरवले

पीटीआय
मंगळवार, 6 जून 2017

मुंबई - भारतीय हॉकी संघाने जोरदार आक्रमक खेळ करीत ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमला ३-२ असे पराजित करीत जर्मनीतील तिरंगी हॉकी स्पर्धा जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. बेल्जियमला स्पर्धेत ही सलग दुसरी हार पत्करावी लागली, त्यामुळे या स्पर्धेतील रंगत वाढली आहे. 

हरमनप्रीतच्या दोन गोलमुळे भारताने रिओ ऑलिंपिकमधील पराभवाचे उट्टे काढले. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्याच्या लढतीत भारतास १-२ हार पत्करावी लागली होती. त्यावेळी आघाडी घेतल्यावर भारत पराजित झाला होता, पण या वेळी हॉकीत वेगाने प्रगती करीत असलेल्या बेल्जियमविरुद्ध अंतिम टप्प्यात घेतलेली आघाडी भारताने गमावली नाही.
पहिल्या सत्रात तेराव्या मिनिटास ॲम्युरी केऊस्टर्स याने बेल्जियमचे खाते उघडले, तेव्हा  रिओतील उपांत्यपूर्व लढतीप्रमाणेच भारतास हार पत्करावी लागणार असेच वाटत होते. हरमनप्रीतने ३४ व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारतास बरोबरी साधून दिली. हरमनप्रीतनेच ३८ व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारतास तिसऱ्या सत्रात आघाडीवर नेले. बेल्जियमला तॅनगुआय कॉसिन्स याने ४५ व्या मिनिटास बरोबरी साधून दिली खरी, पण रमणदीपने जबरदस्त मैदानी गोल करीत भारतास ४९ व्या मिनिटास आघाडीवर नेले. ही आघाडी भारताने सहज राखली.