सदोष खेळाचा भारताला फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई-लंडन - सदोष नेमबाजी तसेच नियोजनबद्ध खेळाचा फटका भारतीय हॉकी संघास मलेशियात बसला. भारतास वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यात मलेशियाविरुद्ध २-३ अशी हार पत्करावी लागली. यजमान या नात्याने भारत वर्ल्ड हॉकी लीगच्या अंतिम टप्प्यास तसेच विश्वकरंडकास पात्र ठरला असला, तरी या स्पर्धेत अव्वल दोन संघांत स्थान मिळवण्याचे भारताचे स्वप्न उद्‌ध्वस्त झाले.

मलेशियाने या स्पर्धेची बाद फेरी गाठताना चीन आणि कोरिया या आशियाई प्रतिस्पर्ध्यांनाच पराजित केले होते. त्यांनी या स्पर्धेतील आशियाई प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची लढत जिंकत आगेकूच केली. मलेशिया पुन्हा एकदा भारतासाठी चांगलाच जिव्हारी लागणारा काटा ठरले. सुलतान अझलान शाह स्पर्धेत मलेशियास दोन गोलच्या फरकाने विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्याची भारतास संधी होती, पण त्या वेळी भारत ०-१ पराजित झाला होता. याचीच पुनरावृत्ती लंडनला घडली.

भारताने या लढतीत ०-२ पिछाडीनंतर २-२ बरोबरी साधली, त्या वेळी भारतीयांचा खेळ आता तरी उंचावेल असे वाटले होते, पण भारतीय आक्रमकांत गोलच्या संधी दवडण्यातच स्पर्धा झाली. अखेरच्या सात मिनिटांत आकाशदीप आणि रमणदीप यांनी दवडलेल्या सोप्या संधी धक्कादायक होत्या. हा पराभव भारताने खरे तर ओढवूनच घेतला.

आक्रमणात ना वेग होता, ना योजना होती. केवळ चेंडू घेऊन जोरदार पळून काही साध्य होत नाही हा धडा भारतीय या लढतीतून शिकले असतील, अशी आशा आहे. हॉकीचा आत्मा असलेली मधली फळी क्वचितच आक्रमणात सक्रिय दिसली. मलेशियाने चांगला योजनाबद्ध खेळ करीत भारतास हार पत्करण्यास भाग पाडले.

या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांत राझी रहीम होता, पण त्याला सहज गोल करण्याची संधी भारतीयांनी दिली. पुढच्याच मिनिटांत तेंगकू ताजुद्दीन याने पेनल्टी कॉर्नरवर मलेशियाची आघाडी वाढवली. रणदीप सिंगने तीन मिनिटांत दोन गोल करीत भारतास बरोबरी साधून दिली, पण रहीमला ४८ व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी देत भारताने पराभव ओढवून घेतला. भारताने प्रतिस्पर्ध्यांना आठ पेनल्टी कॉर्नर दिले.