महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी वंदना कटारिया

पीटीआय
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली: भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी आक्रमक वंदना कटारिया हिची आज (मंगळवार) नियुक्ती करण्यात आली. येत्या 29 ऑक्‍टोबरपासून सिंगापूरमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी 18 जणांचा संघही आज जाहीर करण्यात आला.

नवी दिल्ली: भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी आक्रमक वंदना कटारिया हिची आज (मंगळवार) नियुक्ती करण्यात आली. येत्या 29 ऑक्‍टोबरपासून सिंगापूरमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी 18 जणांचा संघही आज जाहीर करण्यात आला.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व सुशीला चानू हिच्याकडे होते. तिला या संघातून वगळण्यात आले आहे. आशियाई स्पर्धेसाठी सुनिता लाक्रास उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. सिंगापूरमधील आशियाई स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात दोन गोलरक्षक, पाच आक्रमक, सहा मध्यरक्षक आणि पाच बचावपटू आहेत. या स्पर्धेत गतविजेत्या जपानसह चीन, कोरिया, मलेशिया आणि भारताचा समावेश आहे.

भारताचे मुख्य प्रशिक्षक नील हेगवूड म्हणाले, "ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाची कामगिरी आणखी चांगली होऊ शकली असती. पण या संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. क्रीडा विश्‍वातील सर्वोच्च पातळीवर खेळण्याचा अनुभव मिळाल्यामुळे या संघातील खेळाडूंमध्येही चांगला फरक पडला आहे. आशियाई हॉकीमध्ये भारताची कामगिरी चांगली होईल.'' रिओ ऑलिंपिकनंतर काही दिवस भारतीय संघाने पूर्ण विश्रांती घेतली. त्यानंतर भोपाळमधील 'साई'च्या केंद्रात कसून सराव केला आहे.

भारतीय महिला हॉकी संघ :
गोलरक्षक : सविता, रजनी एटिमार्पू
बचावपटू : दीप ग्रेस एक्का, रेणूका यादव, सुनिता लाक्रा, हनिलौम लाल रौत फेली, नमिता टोप्पो
मध्यरक्षक : निक्की प्रधान, नवज्योत कौर, मोनिका, राणी, दीपिका, नवदीप कौर
आक्रमक : पूनम राणी, अनुराधा देवी, वंदना कटारिया, प्रीति दुबे, पूनम बारला.