नदाल, फेडरर 13 वर्षांत प्रथमच अव्वल चौकडीबाहेर

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 ऑक्टोबर 2016

पुरुष एकेरीची क्रमवारी (पहिले 10) :

1) नोव्हाक जोकोविच (सर्बिया 13,540 गुण), 2) अँडी मरे (ब्रिटन 9,845), 3) स्टॅन वॉव्रींका (स्वित्झर्लंड 5,910), 4)केई निशीकोरी (जपान 4,740), 5) रॅफेल नदाल (स्पेन 4,730), 6) मिलॉस राओनीच (कॅनडा 4,690), 7) रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड 3,730), 8) गेल मॉंफिस (फ्रान्स 3,745), 9) टोमास बर्डीच (चेक 3,470), 10) डॉमनिक थिएम (ऑस्ट्रिया 3,295)

लंडन - व्यावसायिक टेनिसमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून विविध प्रकारच्या कोर्टवर अनेक अविस्मरणीय लढती खेळलेले रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल हे दिग्गज जागतिक क्रमवारीत "टॉप फोर‘मधून 13 वर्षांत प्रथमच बाहेर गेले आहेत. दुखापतीमुळे फेडररला दीर्घ ब्रेक घ्यावा लागला आहे, तर नदालच्या फॉर्मलाही दुखापतीमुळे ओहोटी लागली आहे. 

दीर्घकाळ पहिल्या दोन क्रमांकांमध्ये राहिलेल्या फेडरर व नदाल यांची 2003 नंतर प्रथमच अशी घसरण झाली आहे. यापूर्वी 23 जून 2003 रोजी जाहीर झालेल्या क्रमवारीत हे दोघे "टॉप फोर‘मध्ये नव्हते. त्यानंतर दोन आठवड्यांनी फेडररने विंबल्डन जिंकून पहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले. नदाल तेव्हा केवळ 17 वर्षांचा होता. तो 76व्या स्थानावर होता. 2005 मध्ये त्याने फ्रेंच ओपन जिंकून पहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद संपादन केले. फेडररने कारकिर्दीत 17, तर नदालने 14 ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली आहेत. 

सोमवारी जाहीर झालेल्या अद्ययावत क्रमवारीत नदाल चारवरून एक क्रमांक खाली गेला, तर फेडरर सातव्या स्थानावर आहे. या दोघांनी मिळून 31 ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली आहेत. 

फेडररच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. विंबल्डनच्या उपांत्य फेरीत तो पराभूत झाला. तेव्हापासून त्याला "ब्रेक‘ घ्यावा लागला आहे. तो उर्वरित मोसमात खेळण्याची शक्‍यता कमी आहे. नदालला 2014 पासून ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अव्वल स्थान राखले. सात जुलै 2014 पासून तो 115 आठवडे सलग अव्वल क्रमांक टिकवून आहे. ब्रिटनचा अँडी मरे त्याचा पाठलाग करीत आहे. या दोघांमधील फरक 1555 गुणांपर्यंत आला आहे. मरेने रविवारी चायना ओपन विजेतेपद मिळविले. फेडररचा देशबांधव स्टॅन वॉव्रींका तिसरा आहे.