स्लोआनीची परिकथा परिपूर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मॅडिसन किजविरुद्ध लीलया सरशी
न्यूयॉर्क - स्लोआनी स्टीफन्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत जिवलग मैत्रीण मॅडिसन किज हिला लीलया हरवून परिकथेची परिपूर्ण सांगता केली. केवळ तीन गेमच्या मोबदल्यात तिने निर्णायक सामना जिंकत कारकिर्दीतील पहिलेवहिले विजेतेपद मिळविले.

मॅडिसन किजविरुद्ध लीलया सरशी
न्यूयॉर्क - स्लोआनी स्टीफन्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत जिवलग मैत्रीण मॅडिसन किज हिला लीलया हरवून परिकथेची परिपूर्ण सांगता केली. केवळ तीन गेमच्या मोबदल्यात तिने निर्णायक सामना जिंकत कारकिर्दीतील पहिलेवहिले विजेतेपद मिळविले.

स्लोआनीची कामगिरी परिकथेसारखी ठरली. डाव्या पायाच्या दुखापतीमुळे तिला ११ महिने ब्रेक घ्यावा लागला होता. एकवेळ तिला व्हीलचेअर वापरावी लागत होती. मोसमाच्या प्रारंभी ९५७व्या क्रमांकावर घसरण झाल्यानंतर तिने हे यश संपादन केले. अंतिम सामना जिंकल्यानंतर ती भारावून गेली होती. आनंदाच्या भरात करंडक उंचावताना त्यावरील झाकण पडले. स्लोआनीने मागील १७ सामन्यांत १५वा विजय मिळविले.

स्लोआनी म्हणाली की, मागील पाच-सहा आठवड्यांत सारे काही छान जुळून आले. २३ जानेवारी रोजी मला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. तेव्हा जर का मला कुणी सांगितले असते की मी अमेरिकन चॅंपियन बनेन, तर ‘केवळ अशक्‍य’ अशीच प्रतिक्रिया मी व्यक्त केली असती. ही वाटचाल अनोखी आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर जगासाठी मी ती बदलणार नाही.

स्लोआनीचे केवळ सहा फटके चुकले. अशा ‘अनफोर्स्ड एरर्स’ मॅडिसनकडून मात्र ३० वेळा झाल्या. त्यामुळे ‘वीनर्स’च्या बाबतीत मॅडिसनला १८-१० अशा फरकाचा फायदा झाला नाही. मॅडिसन निराश झाली असली तरी, जिवलग मैत्रीण जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली की, ‘स्लोआनी खरोखरच माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी आहे. माझ्या हातात अमेरिकन उपविजेतेपदाचा करंडक असेल असे मला दोन महिन्यांपूर्वी कुणी सांगितले असते तर मला नक्कीच फार आनंद झाला असता आणि स्वतःचा अभिमान वाटला असता.’ या कामगिरीनंतर स्लोआनी जागतिक क्रमवारीत ८३ वरून १७व्या स्थानावर भरारी घेईल, तर १५वी मानांकित मॅडिसन तीन क्रमांकांनी प्रगती करेल.

अंतिम सामना अटीतटीचा होण्याची अपेक्षा होती. २-२ बरोबरीनंतर स्लोआनीने पहिला ब्रेक मिळविला. मॅडिसनचा फोरहॅंड बेसलाइनबाहेर गेला. त्यानंतर सातव्या गेममध्ये स्लोआनीने आणखी ब्रेक मिळविला. पहिला सेट तिने ३० मिनिटांत जिंकला. या सेटमध्ये नऊ गेम झाले. या तुलनेत दुसरा सेट सहा गेममध्ये संपूनही ३१ मिनिटे चालला. यात चौथ्या गेममध्ये मॅडिसनकडून ‘डबल फॉल्ट’ झाली. पाचव्या गेममध्ये मॅडिसनने तीन ब्रेकपॉइंट दवडले. विजय साकार झाल्यानंतर स्लोआनी काही क्षण स्तब्ध होती. मग तिने डाव्या हाताची मूठ आवळून जल्लोष केला.

दृष्टिक्षेपात
स्लोआनी ‘ओपन एरा’मध्ये महिला एकेरीत ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविणारी पाचवी स्पर्धक
लॅट्वियाच्या जेलेना ऑस्टापेन्को हिची यंदा फ्रेंच ओपनमध्ये अशी कामगिरी
या स्पर्धेत २००९ मध्ये बेल्जियमच्या किम क्‍लायस्टर्स
महिला एकेरीतील दोन्ही स्पर्धकांनी ग्रॅंड स्लॅम अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश करण्याची घटना यापूर्वी २०१५ मध्ये
तेव्हा याच स्पर्धेत इटलीच्या फ्लाव्हिया पेन्नेट्टा आणि रॉबर्टा विंची यांच्यात लढत.
अमेरिकन महिला अंतिम सामन्यात शेवटचा सेट ‘लव्ह’ने जिंकण्याची कामगिरी यापूर्वी ख्रिस एव्हर्टची. १९७६ मध्ये तिने इव्हॉनी गुलागाँगला ६-३, ६-० असे हरविले होते.

मी या क्षणी निवृत्ती घेतली तरी चालू शकेल. असे पुनरागमन पुन्हा कधीही साकार होईल असे वाटत नाही.
- स्लोआनी स्टीफन्स

मी सर्वोत्तम खेळ करू शकले नाही म्हणून निराश आहे; पण स्लोआनीने चांगला पाठिंबा दिला. मी हरले ते तिच्याविरुद्ध याचा आनंद आहे.
- मॅडिसन किज

धनादेशाचे पाकीट मैत्रिणीकडे
स्लोआनीला आधी धनादेश प्रदान करण्यात आला. त्यावरील आकडा पाहून ती चकित झाली होती. नंतर तिला करंडक स्वीकारायचा होता. त्यासाठी मंचावरील जागेवर जाण्यापूर्वी तिने धनादेशाचे पाकीट मॅडिसनकडे दिले. त्याआधी सामना संपल्यानंतरसुद्धा ती आपल्या नव्हे, तर मॅडिसनच्या खुर्चीवर तिच्याशेजारी बसली होती. स्लोआनी तिला प्रेमाने ‘मॅडी’ माझी सर्वोत्तम मैत्रीण आहे. ही लढत ‘ड्रॉ’ व्हायला हवी होती, असे मी तिला म्हणाले. काहीही झाले तरी मी तिला पाठिंबा देईन आणि तीसुद्धा हेच करेल. आज तिच्याबरोबर मंचावर उभे राहताना आनंद वाटतो. हीच तर मैत्री असते.’

निकाल
स्लोआनी स्टीफन्स विवि 
मॅडीसन किज  ६-३, ६-०