रामोसचा मरेवर सनसनाटी विजय

पीटीआय
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पॅरिस - स्पेनच्या अल्बर्ट रामोस याने माँटो कार्लो टेनिस स्पर्धेत सनसनाटी निकालाची नोंद करताना अव्वल मानांकित अँडी मरे याचा पराभव केला. रामोसने गुरुवारी झालेल्या लढतीत अँडी मरे याचे आव्हान २-६, ६-२, ७-५ असे संपुष्टात आणले. 

कोपराच्या दुखापतीनंतर पुरागमन करणाऱ्या मरेला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. दुसऱ्या फेरीच्या लढतीत त्याने पहिला सेट ४८ मिनिटांत जिंकत चांगली सुरवात केली. मात्र, त्यानंतर त्याची एकाग्रता भंग पावली. जागतिक क्रमवारीत २४ व्या स्थानी आणि स्पर्धेत १५ वे मानांकन असणाऱ्या डावखुऱ्या रामोसने दुसरा सेट अवघ्या ३६ मिनिटांत जिंकला आणि त्यानंतर तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये ४-० अशी आघाडी घेत विजय निश्‍चित केला. 

मरेच्या सर्व्हिस सातत्याने चुकीच्या होत होत्या. त्यामुळेच त्याच्यावर दडपण आले. त्याचा फायदा रामोसने अचूक उचलला. रामोस विजयी सर्व्हिस करत असताना मरेने एक मॅच पॉइंट वाचवला. त्यानंतर त्याचा परतीचा फटका नेटमध्ये अडकल्याने रामोसच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.