स्मिथच्या टीमलाच शोभतो रडीचा डाव

ball.jpg
ball.jpg

आॅस्ट्रेलिया आणि त्यांचे खेळाडू आतापर्यंत केवळ स्लेजिंगसाठी ओळखले जायचे. पराभव समोर दिसू लागला किंवा प्रतिस्पर्धी संघातला एखादा खेळाडू जोरदार बॅटिंग करत जेरीस आणू लागला की कांगारू टीममधील खेळाडू स्लेजिंग करायचे. बॅट्समनला डिवचायचे. पण स्टिव्ह स्मिथच्या आॅस्ट्रेलिया संघाने आता नवी ओळख निर्माण केली आहे. बॉल टेम्परिंग करणारा संघ, म्हणून आता त्यांच्याकडे  त्याच नजरेने बघितले जाईल आणि स्मिथकडे एक ‘चीटर’ कर्णधार म्हणून...!  गेल्यावर्षी मार्च महिन्यात भारत आणि आॅस्ट्रेलियात बंगळुरूमध्ये कसोटी सामना सुरू होता. त्यावेळीही स्मिथने चिटिंग करण्याचा प्रयत्न केला होता. मैदानावरील अम्पायरने त्याला आऊट दिल्यानंतर ‘डीआरएस रेफरल’ घ्यावा की नाही यासाठी मैदानाबाहेर पव्हेलियनमध्ये बसलेल्या आपल्या संघातील खेळाडूंची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. मैदानातील खेळाडूच अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात, या नियमाची पायमल्ली त्यावेळी स्मिथने केली होती. 

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तिस-या कसोटीत चेंडू कुरतडल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठं वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर काहीवेळातच कर्णधार स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी ही घटना आश्चर्यजनक आणि निराश करणारी म्हटलंय. सकाळी सकाळी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या वृत्तांमुळे आम्ही सर्वच निराश झालो, आमचा संघाचा एखाद्या खोटारडेपणामध्ये समावेश असेल या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. संपूर्ण देशासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. या संदर्भात मॅल्कम टर्नबुल यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षांसोबतही चर्चा केली असून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या या कृतीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स कमिशनने कर्णधारासह संपूर्ण संघाविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांची टीकेची झोड

 दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने चेंडूची छेडछाड केल्याच्या प्रकरणावर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी रविवारी टीकेची झोड उठवली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा काळा दिवस असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. आम्हाला आता कळून चुकले आहे की, आम्ही क्रिकेटपटूंना पैसे, टेप आणि खेळपट्टी खराब करणाऱ्या वस्तूंसह पाठवायला लागलो आहोत. खेळाचे नियम आणि वागणुकीचे नियम तोडण्याचा निश्चय आम्ही केला आहे. एकूणच फसवणूक करण्यापलीकडे आता काहीही शिल्लक राहिलेले नाही. या सगळ्या प्रकारामुळे देशाची नाचक्की झाली आहे, असे पॅट्रिक स्मिथ यांनी दि ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात लिहिले आहे. ज्या पद्धतीने खेळाडू वागत आहेत, जो अहंकार त्यांच्या वागण्यातून दिसत आहे, त्यामुळे खूप त्रास होतो आहे. संघटना, खेळाडू, संस्था आपल्या प्रतिमेतच अडकून पडल्या आहेत. गेल्या काही वर्षांत अशा काही घटना घडल्या आहेत की, एका क्षणाला हा फुगा फुटणार आहे, असे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे (एबीसी) जीम मॅक्सवेल म्हणाले. हेराल्ड सन वृत्तपत्राचे रसेल गॉल्ड यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर टीका करताना 'जर गोष्टी तुमच्या संघाला अनुकूल घडत नसतील म्हणून तुम्ही नियम मोडून रडीचा डाव खेळण्याचा निर्णय घेता, तेव्हाच तुम्ही संघाचे नेतृत्व करण्याचा अधिकार गमावलेला असतो,' असे लिहिले आहे. क्रिकेटलेखक गिडेऑन हेग यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण इतके गंभीर असूनही खेळाडूंनी अगदी सहजपणे ते स्वीकारले, त्याची कबुली दिली. माफीही मागितली नाही. पत्रकार परिषदेत आलेले असताना स्मिथ आणि बँक्रॉफ्ट यांना जणू याचे परिणाम काय होणार हे माहीत नव्हते, असेच त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होते. मला वाटते, गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियन संघ आणि चाहते यांच्यातील नाते दुभंगले आहे. शिवाय, प्रशासन आणि चाहत्यांमधील नात्यातही दुरावा निर्माण झाला आहे. 

ऑस्ट्रेलिया संघाची उडवली टर 

ऑस्ट्रेलियन संघाने चेंडूची छेडछाड केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रविवारी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या चौथ्या दिवशी केपटाउन न्यूलँड्स स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलिया संघाची हुर्यो उडवली. ऑस्ट्रेलियाचा बदली कर्णधार टीम पेनच्या नेतृत्वाखाली संघ रविवारी मैदानावर उतरला. त्यावेळी स्टेडियम तीन चतुर्थांश भरले होते. स्टेडियमच्या विविध भागांमधून प्रेक्षकांकडून क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची हुर्यो उडवण्यात आली. 

काय आहे प्रकरण 

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील ४३व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षक बेनक्रॉफ्ट खिशातून पिवळ्या रंगाची वस्तू काढली. त्याने ती चेंडूवर घासली. हे दृश्य कॅमेऱ्याने टिपले. बेनक्रॉफ्ट याचे थेट प्रक्षेपण होत असल्याचे लक्षात आले आणि तो देखील चाचपला. त्याने ही पिवळी वस्तू ट्रॅकपँटमध्ये लपविण्याचा प्रयत्न केला. यानंतर बँक्रॉफ्टने पंचांना काळे कापड असल्याचे दाखविले. त्यामुळे पंचांनी त्या वेळी काहीही अॅक्शन घेतली नाही. खेळ थांबल्यानंतर स्मिथ आणि बँक्रॉफ्टने गुन्हा कबूल केला. जे काही घडले, ते चुकीचे असून, खेळाच्या तत्त्वात हे बसत नाही. यापुढे असे घडणार नाही, असे वचन देतो, असे स्मिथ म्हणाला. 

स्मिथ, वॉर्नरवर अजीवन  बंदी ?

याच कसोटी सामन्यात चेंडू कुरतडण्याप्रकरणी आयसीसीने ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टीव्ह स्मिथवर एका सामन्यासाठी निलंबित केले असले, तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया स्मिथ, वॉर्नरवर स्वतंत्र कारवाई करण्याचा विचार करत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेनुसार अशा प्रकारच्या आरोपात त्यांच्याकडे आयुष्यभराच्या बंदीचा प्रस्ताव आहे. मात्र, चौकशी समितीचा अहवाल आल्यावरच याविषयी अंतिम निर्णय होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com