खेळाडूंच्या पारितोषिकांसाठी ‘एमओए’ होणार आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंच्या रोख रकमेच्या पारितोषिकासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेने आता आक्रमक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचीदेखील तयारी ठेवल्याचे महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.

पुणे - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंच्या रोख रकमेच्या पारितोषिकासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेने आता आक्रमक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचीदेखील तयारी ठेवल्याचे महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेची (एमओए) कार्यकारिणी बैठक बुधवारी येथे पार पाडली. केरळ येथील स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंची रोख पारितोषिके अजूनही राज्य सरकारकडून दिली गेली नसल्याचाच मुद्दा ऐरणीवर राहिला. या संदर्भात स्मरणपत्र पाठवूनही उपयोग न झाल्यामुळे आता ‘एमओए’च्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला असून, मुंबईत अधिवेशनाच्या काळात उपोषण करण्याविषयीची शक्‍यता या बैठकीत पडताळून पाहण्यात आली. 

‘एमओए’ अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस धनंज भोसले, प्रल्हाद सावंत, प्रकाश तुळपुळे यांच्यासह बहुतेक कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. अन्य राज्यांपेक्षा पारितोषिक रक्कम कमी असूनदेखील ती देण्यात सरकार काचकुच करत असल्याबद्दल अजित पवार म्हणाले, ‘‘राज्यातील खेळाडूंबाबत अनेकदा क्रीडामंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. यानंतरही खेळाडूंना पैसे मिळत नसतील, तर अर्थसंकल्पी अधिवेशात सर्व खेळाडूंसह आपण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेऊ.’’

२५ मार्चला निवडणुका
‘एमओए’ची दर चार वर्षांनी होणारी निवडणूक या वेळी २५ मार्च रोजी घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. यासाठी ज्या बहुविध खेळांच्या संलग्न राज्य संघटनांना मतदानाचा अधिकार आहे अशा संघटनांतील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीस उभे राहण्यासाठी १५ मार्च रोजी अर्ज दाखल करावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. भारतीय ऑलिंपिक संघटना आणि धर्मादाय आयुक्त यांनासुद्धा त्यांचा प्रतिनिधी पाठविण्यासाठी पत्र दिले जाईल, असे लांडगे यांनी या वेळी संपर्क साधला असता सांगितले.

Web Title: Award for the players