चँपियन्स करंडकासाठी सोमवारी भारतीय संघाची निवड

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

संघ निवडण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल ही असतानाही अजून संघाची निवड का करण्यात आली नाही, अशी विचारणा प्रशासकीय समितीने बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांच्याकडे केली होती.

मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) वाद सुरु असला तरी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार हे निश्चित झाले आहे. या स्पर्धेसाठी सोमवारी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.

नुकतेच खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे अनावरण करून, बीसीसीआयने आयसीसीला गुगली टाकला; पण काही तासांतच बीसीसीआयचा कारभार चालवत असलेल्या प्रशासकीय समितीने चॅंपियन्स स्पर्धेसाठी लवकरात लवकर संघाची निवड करा, असा आदेश दिला होता. त्यामुळे आता सोमवारी संघनिवड करण्यात येणार आहे. कर्णधार विराट कोहली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संघनिवडीवेळी सहभागी होणार आहे.
 
संघ निवडण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल ही असतानाही अजून संघाची निवड का करण्यात आली नाही, अशी विचारणा प्रशासकीय समितीने बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांच्याकडे केली होती. चॅंपियन्स करंडक या स्पर्धेचे आपण गतविजेते आहोत. त्यामुळे आता या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2 जूनपासून इंग्लंडमध्ये ही स्पर्धा सुरु होत आहे.