भारताचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश

भारताचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश

लंडन - ‘जिंका किंवा मरा’ अशा स्थितीत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आठ गडी राखत परतवून लावत चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दक्षिण आफ्रिकेला किरकोळीत रोखून भारताने अर्धा सामना जिंकला होता. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले. 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय गोलंदाजांनी यशस्वी ठरवला. विशेष म्हणजे या वेळी गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांकडून सुरेख साथ मिळाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४४.३ षटकांत १९१ धावांत आटोपला. त्यानंतर शिखर धवन (७८) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद ७६) यांनी १२८ धावांची भागीदारी करत भारताचा विजय साकार केला. धवन बाद झाल्यावर युवराजने षटकार ठोकत थाटात विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ३८ षटकांतच लक्ष्य पार करताना २ बाद १९३ धावा केल्या. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सामन्याचा मानकरी ठरला. भारताची आता १५ जून रोजी बांगलादेशाविरुद्ध उपांत्य लढत होईल. 

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर पावसाळी हवामानात भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करण्यापासून रोखले. भारताच्या पाचही गोलंदाजांनी अचूक दिशा आणि टप्पा राखून गोलंदाजी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या कसलेल्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनाही धावा काढण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यातच भारताचे क्षेत्ररक्षणही नजरेत भरण्यासारखे झाले. त्यांनी तीन फलंदाजांना धावबाद केले. या एकत्रित प्रयत्नांमुळेच दक्षिण आफ्रिकेचा धावफलक रोखला गेला. इथेच भारताने अर्धा सामना जिंकला होता. जेपी ड्युमिनी अखेरपर्यंत नाबाद राहिला; पण त्याला केवळ दुसऱ्या बाजूने होणारी संघाची पडझडच बघावी लागली. 

विजयासाठी १९२ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने आततायीपणे आपली विकेट गमावली. त्यानंतर धवन आणि कोहली यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना वरचढ ठरण्याची संधीच दिली नाही. सलग तिसऱ्या सामन्यात धवनने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हैराण केले. कोहलीनेदेखील धवनला स्वातंत्र्य दिले आणि जम बसल्यावर स्वतः आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. शतक गाठण्याच्या घाईत धवन बाद झाला; पण कोहली आणि युवराज यांनी शांतपणे विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका ४४.३ षटकांत सर्वबाद १९१ (क्विंटॉन डी कॉक ५३ ७२ चेंडू, ४ चौकार, डू प्लेसिस ३६, हशिम आमला ३५, जेपी ड्युमिनी नाबाद २०, भुवनेश्‍वर कुमार २-२३, जसप्रीत बुमरा २-२८) पराभूत वि. भारत ३८ षटकांत २ बाद १९३ (शिखर धवन ७८ -८३ चेंडू, १२ चौकार, १ षटकार, विराट कोहली नाबाद ७६ -१०१ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, युवरासिंग नाबाद २३).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com