श्रीकांत डेन्मार्कमध्ये सुपर 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

यंदाच्या मोसमातील श्रीकांतचे यश 
- जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेन याची सलग 13 विजयांची मालिका खंडित 
- यंदा सलग दोन सुपर सीरिज स्पर्धा जिंकलेला पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन 
- सलग तीन सुपर सीरिज स्पर्धांत अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम 
- वर्ल्ड सुपर सीरिजच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलेला पहिला भारतीय 
- या स्पर्धेपूर्वी यंदाची एकंदरीत बक्षीस रक्कम 1 लाख 49 हजार 797 डॉलर 
- एकाच वर्षी चार सुपर सीरिज स्पर्धांत अंतिम फेरी गाठलेला पहिला भारतीय 

ओडेन्स (डेन्मार्क) : किदांबी श्रीकांतने या वर्षातील तिसरे सुपर सीरिज विजेतेपद जिंकताना डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने जायंट किलर संबोधले जात असलेल्या ली ह्यून ली हो याचा झटपट दोन गेममध्ये पराभव केला. 

या स्पर्धेतील महिला एकेरीची लढत 67 मिनिटे आणि अन्य तीन दुहेरीच्या अंतिम लढती जवळपास एक तास झाल्यावर श्रीकांतची लढत किती वेळ रंगणार याचीच चर्चा होती; पण श्रीकांतने अवघ्या 25 मिनिटांत आपल्या अनुभवी प्रतिस्पर्ध्यास 21-10, 21-5 अशी शरणागती पत्करण्यास भाग पाडले. श्रीकांतचे हे यंदाचे तिसरे सुपर सीरिज विजेतेपद. त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपन आणि इंडोनेशियन ओपन स्पर्धा जिंकल्या होत्या, तर बी साई प्रणीतविरुद्धची सिंगापूर ओपन स्पर्धेतील अंतिम लढत गमावली होती. त्याने पहिला गेम झटपट 12 मिनिटांत जिंकला, तोपर्यंत त्याची आक्रमकता कशी रोखायची याबाबत ली ह्यूनचा विचारही पूर्ण झाला नसेल. दुसऱ्या गेममध्ये तर श्रीकांतच्या स्मॅश, ड्रॉप्स; तसेच नेटजवळील टचनी ली ह्यून जास्तच जेरीस आला. ली ह्यूनने संभाव्य विजेत्यात गणना होत असलेल्या सॉन वॉन हो आणि चेन लॉंग यांना हरवून अपेक्षा उंचावल्या होत्या; पण श्रीकांतने भारतीय बॅडमिंटनची ताकदच दाखवून दिली. त्याच वेळी भारताची या स्पर्धेतील विजेतेपदाची 38 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली. यापूर्वी ही स्पर्धा 1979 मध्ये प्रकाश पदुकोण यांनी जिंकली होती. 

एका वर्षात तीन सुपर सीरिज जिंकण्याच्या साईना नेहवालच्या विक्रमाची बरोबरी श्रीकांतने केली. ली ह्यून याला शनिवारी दीड तासाची उपांत्य लढत खेळावी लागली होती. त्याला कोणतीही दयामाया श्रीकांतने दाखवली नाही. सुरवातीस श्रीकांतला जोरदार प्रोत्साहन होते; पण श्रीकांतचा एकतर्फी धडाका पाहून चाहत्यांनी ली ह्यूनच्या प्रत्येक गुणाचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक करण्यास सुरुवात केली खरी, पण त्याला ही संधी फारशी लाभलीच नाही. 