साकेत जायबंदी, बोपण्णामुळे नाकेबंदी; अखेर विष्णू पावला

- मुकुंद पोतदार
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

डेव्हिस करंडकासाठी दुहेरीचा जोडीदार मिळविण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाची कसरत

डेव्हिस करंडकासाठी दुहेरीचा जोडीदार मिळविण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाची कसरत
पुणे - सांघिक स्पर्धेच्यावेळी टेनिस संघावरून नाट्यमय घडामोडी आणि वाद निर्माण होण्याचा प्रकार पुन्हा घडला आहे. न्यूझीलंडविरुद्ध डेव्हिस करंडक लढतीचा ड्रॉ निघण्यास 24 तासांपेक्षा कमी वेळ उरला असताना बरेच काही घडले. जायबंदी साकेत मायनेनी खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बोपण्णाशी संपर्क साधण्यात आला; पण त्याने नकार दिल्याने संघाचीच नाकेबंदी झाली. अखेर विष्णू वर्धनशी संपर्क साधण्यात आला. कझाकिस्तानचा व्हिसा न मिळाल्याने मायदेशातच असलेला विष्णू ड्रॉला काही तास बाकी असताना हैदराबादहून पुण्यात दाखल झाला. त्यामुळे दुहेरीचा जोडीदार मिळविण्याची कसरत अखेर संपुष्टात आली.

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवारपासून आशिया-ओशेनिया विभागातील गट क्रमांक एकची ही लढत सुरू होत आहे. मूळ संघात युकी भांब्री, साकेत मायनेनी व रामकुमार रामनाथन हे तीन एकेरीचे, तर दुहेरीत लिअँडर पेस असे चौघे आहेत. यात पेससह साकेत खेळण्याची अपेक्षा होती; पण उजव्या पायाच्या दुखापतीमधून तो तंदुरुस्त झाला नसल्याचे बुधवारी दुपारी स्पष्ट झाले. त्यानंतर आधी बोपण्णाशी संपर्क साधण्यात आला, पण त्याने नकार दिला. बोपण्णाशी नेमका कुणी संपर्क साधला याची कल्पना नाही. त्याच्याशी तीन जण बोलले; पण मी त्यात नाही, असे वक्तव्य नॉन-प्लेइंग कॅप्टन आनंद अमृतराज यांनी केले. त्याचवेळी मी बोपण्णाला फोन करणार होतो, पण मला रोखण्यात आले, असा दावा पेसने केला. कुणी मनाई केली, या प्रश्‍नाला पेसने बगल दिली. त्यामुळे वादात भर पडली.

दुहेरीत दिवीज शरण-पुरव राजा ही फॉर्मातील जोडी; तसेच जीवन नेदूंचेझीयन असे तीन पर्यायसुद्धा होते; पण ते तिघे अमेरिकेत चॅलेंजर स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांचे उपलब्ध होणे अशक्‍य होते, अशी माहिती अमृतराज यांनी दिली.

अखेरीस विष्णूशी संपर्क साधण्यात आला. तो कझाकिस्तानमधील स्पर्धेत सहभागी होणार होता; पण व्हिसा न मिळाल्यामुळे तो हैदराबादमध्येच सराव करीत होता. पेसने सर्वप्रथम संपर्क साधल्यानंतर त्याने तयारी दर्शविली. व्हिसा मिळाला असता, तरी आधी देशासाठी खेळण्यालाच प्राधान्य दिले असते, अशी भावना विष्णूने व्यक्त केली.

वेळ आल्यास सलग तीन दिवस खेळणार का, असे युकीला विचारण्यात आले. त्याने होकार दर्शविला. पेसने याचा आवर्जून उल्लेख करीत युकीचे कौतुक केले. पेसने साकेतचाही उल्लेख केला. तो म्हणाला, की कुणालाही दुखापत होणे मजा नसते. साकेत संघाचा आधारस्तंभ आहे. त्याने लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावे.

 

दुहेरीत जागतिक क्रमवारीनुसार न्यूझीलंडची जोडी सरस आहे. पण एकूण विचार केल्यास आमचे पारडे जड राहील.
- आनंद अमृतराज, भारताचे कर्णधार

भारतीय संघात ऐनवेळी बदल झाल्याचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही ठरलेल्या नियोजनानुसार खेळू.
- ऍलिस्टर हंट, न्यूझीलंडचे कर्णधार

आजचे सामने
सलामीच्या एकेरी
युकी भांब्री वि. फिन टिअर्नी
रामकुमार रामनाथन वि. ज्योस स्टॅथम
वेळ दुपारी 3 पासून

शनिवारची लढत
लिअँडर पेस-विष्णू वर्धन वि. आर्टेम सिटॅक-मायकेल व्हिनस

रविवारी परतीच्या एकेरी
रामकुमार वि. टिअर्नी
युकी वि. स्टॅथम

Web Title: devis karandak indian team