मॅच फिक्सर्सवर घालावी आजन्म बंदी - आमीर

वृत्तसंस्था
रविवार, 19 जून 2016

इस्लामाबाद - स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीच्या कारवाईला सामोरे गेलेला पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरने आता मॅच फिक्सिंग करणाऱ्या खेळाडूंवर आजन्म बंदी घालावी, असे वक्तव्य केले आहे.

इस्लामाबाद - स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीच्या कारवाईला सामोरे गेलेला पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरने आता मॅच फिक्सिंग करणाऱ्या खेळाडूंवर आजन्म बंदी घालावी, असे वक्तव्य केले आहे.

आमीर 2010 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी सापडला होता. त्याला कारागृहात राहण्याची आणि पाच वर्षे बंदीची शिक्षा झाली होती. या शिक्षेनंतर त्याने पाकिस्तान संघात पुनरागमन केले आहे. पाकिस्तानचा संघ या महिन्यात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी आमीरचे संघात निवड झाली असून, तो इंग्लंडमध्ये पुन्हा खेळताना दिसणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी आमीरने फिक्सिंगप्रकरणी वक्तव्य केले आहे.

आमीर म्हणाला की, मॅच फिक्सर्सला जन्माची अद्दल घडविण्यासाठी त्या खेळाडूंवर आजन्म बंदी घालण्यात यावी. क्रिकेटमध्ये अजूनही फिक्सिंग चालत असेल, तर ती धोक्याची घंटा आहे. माझे अशा क्रिकेटपटूंवर बंदी घालण्याच्या निर्णयाला पूर्णपणे समर्थन आहे. मी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल असा विचारही केला नव्हता. पण, आता मला पुन्हा एकदा लॉर्ड्सवर कसोटी खेळण्याची संधी मिळत आहे. ज्या लॉर्ड्सवर माझी कारकिर्द थांबली होती, त्याच मैदानातून पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने कसोटी कारकिर्द सुरु होत आहे.