ऍथलेटिक्‍ससाठी आता परदेशी प्रशिक्षक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी भारताच्या ऍथलेटिक्‍स महासंघाला परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याची बुधवारी परवानगी दिली. आंतरराष्ट्रीय स्तराव भारतीय खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने दोन प्रशिक्षक, तसेच दोन मसाजर यांची नावे क्रीडा मंत्रालयाकडे मान्यतेसाठी पाठविली होती. या चारही नावांना क्रीडामंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार चालण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे डेव्ह स्मिथ, चारशे मीटर आणि चारशे मीटर रिलेसाठी अमेरिकेचे गॅलिना पी. बुखारिना यांच्या नियुक्तीस क्रीडा मंत्रालयाने मान्यता देखील दिली आहे.

त्याचबरोबर रशियाच्या दिमित्री किस्लेव आणि एलमिरा किस्लेवा यांची मसाजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना भक्कमपणे उभे राहता यावे यासाठी ऍथलेटिक्‍ससाठी परदेशी प्रशिक्षकांना परवानगी देण्यात आल्याचे क्रीडामंत्र्यांनी स्पष्ट केले.