यशस्वी पुनरागमनासाठी सज्ज - कश्‍यप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई - प्रतिस्पर्ध्यांऐवजी दुखापतींबरोबरच जास्त लढणे भाग पडलेला पारुपली कश्‍यप चायना मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेद्वारे यशस्वी पुनरागमन करण्याची आशा बाळगून आहे. या स्पर्धेत कश्‍यपला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून उद्या तो दुसऱ्या फेरीत चीनच्या तिसऱ्या मानांकित क्विआओ बिन याच्याशी खेळेल.

काही वर्षांपूर्वी अव्वल दहामध्ये असलेला कश्‍यप सध्या जागतिक क्रमवारीत १०४ वा आहे. १४ महिने दुखापतीमुळे तो क्वचितच खेळला आहे. त्याला सध्या स्पर्धेत खेळणार असल्याचाच जास्त आनंद आहे. या दुखापतींच्या मालिकेमुळे तो पुन्हा स्पर्धेत खेळूच शकणार नाही, असे गोपीचंद यांनाही वाटत होते; पण तो कोर्टवर परत आला. डिसेंबरमध्ये त्याने कोरिया मास्टर्स स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली; पण जानेवारीत प्रीमियर बॅंडमिंटन लीग खेळताना तो घसरून पडला आणि त्याच्या खांद्याला जबर दुखापत झाली होती.

भारतीय क्रमवारीत टॉप टेनमध्ये नसल्याचे कश्‍यपला दुख आहे; पण स्पर्धेत खेळत नसल्यामुळे ही घसरण झाली आहे. लीन दान तसेच अनेक चिनी खेळाडू असलेल्या या स्पर्धेत कश्‍यपला जेतेपदाची आशा नाही; पण स्पर्धा फिटनेस तपासता येईल, याची त्याला खात्री आहे. जिंकल्याशिवाय मानांकन उंचावत नाही. जिंकण्यासाठी खेळावे लागते. या स्पर्धेपासून त्यास सुरवात नक्कीच झाली आहे, असे कश्‍यपने सांगितले.

दाणी दुसऱ्या फेरीत
भारताच्या हर्षिल दाणीने पहिल्या फेरीत चुन वेई चेन याचा २१-१७, २१-१८ असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये दाणीने सुरवातीला मिळविलेली आघाडी कायम राखली होती. दुसऱ्या गेममध्ये मात्र तो एक वेळा १०-११ असा मागे पडला होता. त्या वेळी १६-१६ अशा बरोबरीनंतर दाणीने आपले नियंत्रण परत मिळविले आणि नंतर चेनला संधीच 
दिली नाही. 

बहुतेक भारतीयांची माघार
पुढील आठवड्यात वैयक्तिक गटाची आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धा असल्याने भारताच्या बहुतेक प्रमुख खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.