गुजरातचे पहिल्या विजेतेपदाचे लक्ष्य

पीटीआय
मंगळवार, 10 जानेवारी 2017

इंदौर - तब्बल सहासष्ट वर्षांनी रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यावर गुजरातने या वेळी विजेतेपदाचे स्वप्न बाळगले आहे. स्पर्धेत ४६व्यांदा अंतिम फेरी गाठून ४१ वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या गतविजेत्या मुंबईशी त्यांची गाठ पडणार आहे. 

इंदौर - तब्बल सहासष्ट वर्षांनी रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यावर गुजरातने या वेळी विजेतेपदाचे स्वप्न बाळगले आहे. स्पर्धेत ४६व्यांदा अंतिम फेरी गाठून ४१ वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या गतविजेत्या मुंबईशी त्यांची गाठ पडणार आहे. 

स्पर्धेच्या इतिहासाचा हा विरोधाभास खूप बोलका असला, तरी या वेळी मुंबईची अंतिम फेरीपर्यंत अडखळत झालेली वाटचाल लक्षात घेता गुजरातची बाजू प्रथमदर्शनी भक्कम वाटत आहे. कामगिरीच्या तुलनेत गुजरात एक पाऊल पुढे असले तरी मानसिकतेच्या आघाडीवर मुंबईच्या खेळाडूंनी नेहमीच बाजी मारली आहे, हे विसरून चालणार नाही. त्यांच्या खेळाडूंनी नसानसांत भिनलेल्या क्रिकेटचा प्रत्यय वेळोवेळी दिला आहे. सहासष्ट वर्षांपूर्वी गुजरात येथेच अंतिम फेरीची लढत हरले होते. हा त्यांच्या या लढतीचा योगायोग म्हणता येईल. 

क्रिकेट आणि मुंबई हे समीकरण नवे नाही. तरी यंदा त्यांना अंतिम फेरीपर्यंत पोचण्यात अनेक अडथळे आले आहेत. सलामीच्या फलंदाजाची उणीव, प्रमुख खेळाडूंच्या दुखापती त्यांच्या डोकेदुखी ठरल्या आहेत. तमिळनाडूविरुद्ध पृथ्वी शॉ या गुणी फलंदाजाने पहिल्या डावातील अपयशानंतर दुसऱ्या डावात झळकावलेले शतक मुंबईच्या फलंदाजीच्या फळीला निश्‍चित दिलासा देणारे ठरावे. मुंबई संघात अनेक दिवासांनी प्रथमच एकही वलयांकित खेळाडू नाही. अनुभवाच्या शिदोरीत संघातील काही खेळाडू कमीच आहेत. त्यामुळेच संघातील युवा पिढीवरच सगळ्या आशा राहणार आहेत. यात अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, अभिषेक नायर, आदित्य तरे यांच्यावर मुंबईच्या आशा अवलंबून राहतील. गोलंदाजीत शार्दूल ठाकूरला सातत्य दाखवावे लागेल. अर्थात, त्यांच्या विजय गोहिलच्या फिरकीने या मोसमात चांगलीच चमक दाखवली आहे. तुषार देशपांडे अंतिम लढतीत खेळण्याची शक्‍यता असली, तरी त्याला संघात स्थान देताना कुणाला वगळायचे ही मुंबईची डोकेदुखी ठरेल. 

दुसरीकडे यंदाच्या मोसमात धावांचे रतीब टाकणारा प्रियांक पाचांळ आणि समित गोहेल या सलामीच्या जोडीवर गुजरातच्या यशाची सुरवात अवलंबून असेल. एक त्रिशतक, एक द्विशतकासह मोसमात १२७० धावा पांचाळच्या नावावर आहेत. गोहेल देखील मोसमातील ९०० धावांच्या जवळ आहे. त्यामुळे त्यांची सलामी हेच गुजरातचे मुख्य अस्त्र राहिल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. मनप्रीत जुनेजा आणि पार्थिव पटेल यांची त्यांना मदत मिळेल. 

यंदाच्या मोसमात गुजरात संघाने जी तडफ दाखवली आहे, ती कायम राहिल्यास गतविजेत्यांसमोर निश्‍चितपणे आव्हान उभे राहू शकते. पण, गोलंदाज जसप्रीत बुमरा एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेल्यामुळे त्यांना एक धक्का जरूर बसला आहे. आयात केलेला गोलंदाज आर. पी. सिंगच त्यांची गोलंदाजीची ताकद असेल. बुमराच्या जागी मेहुल पटेलला संधी मिळेल.