आयपीएलमुळे मी भारतीय संघात : धवन

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

चँपियन्स करंडकात खेळण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळे मला ही संधी मिळाली. चांगली कामगिरी केल्यास त्याकडे दुर्लक्ष होत नाही.

हैदराबाद - आयपीएलमधील कामगिरीमुळे मी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात स्थान मिळवू शकलो, असे भारताचा सलामीवीर शिखर धवनने म्हटले आहे.

चँपियन्स करंडकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये तीन सलामीवीरांच्या यादीत धवनलाही संधी देण्यात आली आहे. आयपीएलच्या दहाव्या मोसमात शिखर धवन चांगली कामगिरी करत असून, तो सर्वाधिक धावा बनविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 12 सामन्यांमध्ये 450 धावा केल्या आहेत. धवनने सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद 62 धावा केल्या होत्या.

धवन म्हणाला, ''चँपियन्स करंडकात खेळण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळे मला ही संधी मिळाली. चांगली कामगिरी केल्यास त्याकडे दुर्लक्ष होत नाही. भारतीय संघात बराच काळ खेळण्यासाठी मी माझ्या कामगिरीत सातत्य ठेवेन. चँपियन्स करंडकात खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. आम्ही पुन्हा हा करंडक जिंकण्यासाठी प्रयत्न करू.''