भारतीय बॅडमिंटन जोडीने स्पर्धेची बसच चुकविली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई - आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळणाऱ्या भारतीय जोड्यांचा नो शो झाला. पुरुष दुहेरीतील कपिल चौधरी आणि ब्रिजेश यादव यांनी स्पर्धेची बसच चुकविली, तर संयोगिता घोरपडे आणि प्राजक्ता सावंत यांनी मलेशियातून चीनसाठी केलेला व्हिसाचा अर्ज फेटाळला गेला.

मुंबई - आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळणाऱ्या भारतीय जोड्यांचा नो शो झाला. पुरुष दुहेरीतील कपिल चौधरी आणि ब्रिजेश यादव यांनी स्पर्धेची बसच चुकविली, तर संयोगिता घोरपडे आणि प्राजक्ता सावंत यांनी मलेशियातून चीनसाठी केलेला व्हिसाचा अर्ज फेटाळला गेला.

ब्रिजेश आणि कपिल पुरुष दुहेरीच्या पात्रता फेरीची लढत खेळणार होते. त्यांना कार्यक्रमाची कल्पना भारतीय संघाने दिली होती. त्यांनी आपल्या लढतीनुसार स्पर्धेच्या अधिकृत हॉटेलहून स्पर्धा ठिकाणी जाणारी बस पकडणे आवश्‍यक होते, पण ही बसच त्यांनी चुकविली, त्यामुळे त्यांनी वॉकओव्हर दिल्याचे नमूद करण्यात आले. ‘‘भारतीय संघव्यवस्थापकांनी सर्व खेळाडूंना त्यांचा कार्यक्रम दिला होता. त्यानुसार शटल बसचे वेळापत्रकही दिले होते. पण ब्रिजेश आणि कपिल आपली बस पकडूच शकले नाहीत. ते अर्ध्या तासाने पोचले, पण तोपर्यंत वॉकओव्हर नोंदविला होता. खेळाडूंनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही,‘ असे भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या कार्यालयातील राजीव मेहता यांनी सांगितले. 

दरम्यान, संयोगिता आणि प्राजक्ताला व्हिसा मिळू शकला नाही.प्राजक्ता म्हणाली, ‘‘आम्ही मलेशियात स्पर्धेसाठी गेलो होतो. तेथून आम्ही चीनच्या  व्हिसासाठी अर्ज केला. आमच्या पासपोर्टवर व्हिसा नाकारल्याचे नमूद करण्यात आले. आम्हाला यापूर्वी मलेशियातून चीनचा व्हिसा मिळाला होता, पण आता नियम बदलल्याचे सांगण्यात आले.’’

भारत आणि चीनचे संबंध पाहता तेथील व्हिसासाठी पंधरा दिवस अगोदरच अर्ज करावा लागतो. अन्य देशांतून दुसऱ्या देशाचा व्हिसा मिळणे आपल्यासाठी कठीण असते. यामुळे संबंधितांनी योग्य खबरदारी घ्यायला हवी होती, असे भारतीय  बॅडमिंटनमधील एका वरिष्ठ आधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, महिला एकेरीच्या पात्रतेत ऋत्विका गाडे हिने पात्रतेतील दोन्ही लढती सहज जिंकल्या. तिने मालदीव आणि व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या सामन्यात प्रत्येकी ११ गुण गमावले. श्रीकृष्णा प्रियानेही तिच्या पात्रतेतील लढती दोन गेममध्येच जिंकल्या. मिश्र दुहेरीत रोहन कपूर - कूहू गर्ग आणि सौरभ शर्मा - अनुष्का पारेख या जोड्या होत्या. पण त्यांच्या पात्रता गटात एकही स्पर्धक नव्हते, त्यामुळे त्यांनी आगेकूच केली.

Web Title: Indian badminton pair missed the competition