भारतीय महिला संघ कोणा एका खेळाडूवर विसंबून नाही: तुषार आरोठे

सुनंदन लेले
रविवार, 23 जुलै 2017

तुला सांगतो मुली एकदम उत्साहात आहेत. ऐतिहासिक लॉर्डसवर विश्‍वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना खेळताना आपला ठसा उमटविण्यासाठी मुली जय्यत तयारीत आहेत...

भारतीय महिला संघाने आयसीसी विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्याने चांगलीच धूम झाली आहे. उपांत्य सामन्यात बलाढ्य आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय महिला क्रिकेट संघाने तगडा खेळ करत धूळ चारली. तो धमाल सामना रसिकांनी रात्री जागत प्रत्यक्ष अनुभवला. एकीकडे पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकावरून बरेच वादंग झाले; तर दुसऱ्या बाजूला महिला संघाचा प्रशिक्षक, "आपण बरे आपले काम बरे' म्हणत संघाला मार्गदर्शन करताना दिसला. बडोद्याकडून रणजी खेळलेला अष्टपैलू खेळाडू तुषार आरोठे महिला संघाचा प्रशिक्षक आहे. ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर आज (रविवार) होणाऱ्या अंतिम सामन्याच्या पार्श्‍वभूमीवर तुषारने खास "सकाळ'ला मुलाखत दिली.

महिला संघाच्या अद्‌भूत प्रवासाविषयी:
बघणाऱ्यांना हा प्रवास ताजा वाटेल पण संघाकरता आणि सपोर्ट स्टाफ करता हा प्रवास चार महिन्यांपूर्वी सुरु झाला होता. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला असताना आम्हांला विश्‍वकरंडक खेळणारा भारताचा संघ काय असेल , कुठे कमतरता जाणवत आहेत आणि बलस्थाने काय आहेत याचा खरा अंदाज आला होता. नेमके त्याच अनुभवांना हाताशी धरून आम्ही योजना आखल्या आणि त्याची अंमलबजावणी केली. पहिल्या सामन्यात आपल्या संघाने यजमान इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का दिला तेव्हा वाटचाल योग्य दिशेला चालू आहे, याची पावती मिळाली. तीच लय पकडून ठेवत संघ आता अंतिम सामन्यात येऊन दाखल झाला आहे.

संघातील तरुण खेळाडूंनी आपली जबाबदारी ओळखून कामगिरी केल्याबद्दल:
स्पर्धा चालू होतानाच पहिल्या बैठकीत मी एकच गोष्ट ठासून सांगितली होती. "सामना जिंकायला एका खेळाडूची कामगिरी पुरेशी होते... स्पर्धा जिंकायची असेल तर सगळ्यांनी कामगिरी एकत्र करावी लागते...आपापली जबाबदारी पार पाडावी लागते'. पहिल्या दोन सामन्यात स्मृती मंधानाने जबरदस्त खेळी केली, पाकिस्तानविरुद्ध एकता बिश्‍तने सुंदर खेळ केला, श्रीलंकेसमोर दीप्ती राऊतने
भन्नाट खेळी केली, गेल्या सामन्यात हरमनप्रीत कौरने अविश्‍सनीय खेळी केली आणि मिताली राजचे सातत्य लक्षणीय आहेच. याचाच अर्थ असा की, विजय मिळवायला संघ कोणा एका खेळाडूवर विसंबून नाही. मला हे सर्वात चांगले लक्षण वाटते. आमचे काम आहे सर्वोत्तम तयारी करून घेणे आणि प्रत्येक खेळाडूला संघात काय भूमिका आहे ते समजावून सांगणे. मग ते मैदानात उतरवणे ही खेळाडूची जबाबदारी असते.

आक्रमक फलंदाजी बद्दल:
आम्ही जात्याच आक्रमक खेळणाऱ्या फलंदाजाला त्याची शैली बदलायला कधीच सांगत नाही. संघाची गरज ओळखून खेळायला पाहिजे इतकीच अपेक्षा असते. जर काही फलंदाज लवकर बाद झाले असले तर हवेतून फटके सतत मारू नयेत, जेणे करून अनावश्‍यक धोका टाळता येतो इतकाच भाग असतो. एकदा का जम बसला आणि समोरचा संघ गडबडू लागला की मग मोठे आक्रमक फटकेही मारता येतात. मला वाटते भारतीय फलंदाजांकडून अशा आक्रमक फलंदाजीची कोणाला अपेक्षा नव्हती ज्याने धसका बसला आहे. उपांत्य सामन्यात हरमनप्रीत कौरने सादर केलेली खेळी अविश्‍वसनीय होती. अशी खेळी अशा मोठ्या सामन्यात करता येणे यातच सगळे आले.

वर्ल्डकप सारख्या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याचा काय फरक पडलाय?
लोकांच्या नजरा महिला संघाकडे वळल्या आहेत त्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच. नुसता बाहेर फरक पडला आहे, असे नाही. संघात आणि खेळाडूंच्या कार्यपद्धतीत फरक पडला आहे. मला कल्पना आहे की, फिटनेस खाण्याच्या सवयी यात अजून खूप बदल व्हायला हवा. फिटनेस वाढायलाच हवा. पण एक सांगतो की सध्याच्या यशाने मुलींच्या विचारात वागण्यात खूप चांगला आणि सकारात्मक फरक पडला आहे. त्यांना आता जाणीव व्हायला लागली आहे. महिला क्रिकेटबद्दल भारतात जे नकारात्मक विचार होते, त्यात मोठा फरक पडेल अशी मला खात्री आहे.

भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांबद्दल:
स्पर्धा चालू झाल्यावर झूलन गोस्वामीचा खेळ अपेक्षेनुसार होत नव्हता. तिला अस्वस्थता यायला लागली असताना मी तिला शांत केले आणि सरावात मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सांगितले. उपांत्य सामन्यात झूलनने केलेला मारा अफलातून होता. तिने मेल लॅनींगला बाद करताना टाकलेला चेंडू अप्रतिम होता. नुसतीच झूलन नाही तर पांडेने दुसऱ्या बाजूने केलेली गोलंदाजी उत्तम होती ज्याने दडपण वाढत गेले.

लॉर्डसवर अंतिम सामना खेळण्याबाबत:
अगदी स्पष्ट सांगायचे झाले तर लॉर्डसवर आपल्या संघातील तीन चार मुली सामना खेळल्या आहेत. या मैदानावर एका बाजूला उतार आहे याचा विचार करून आपल्या फिरकी गोलंदाजांना कोणत्या दिशेला मारा करायचा आणि कोणत्या गोलंदाजाला कोणत्या बाजूने गोलंदाजीला आणायचे, याचे नियोजन करावे लागणार आहे. तुला सांगतो मुली एकदम उत्साहात आहेत. ऐतिहासिक लॉर्डसवर विश्‍वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना खेळताना आपला ठसा उमटविण्यासाठी मुली जय्यत तयारीत आहेत.