किंमत सार्थ ठरविण्यासाठी कसून तयारी - स्टोक्‍स

मुकुंद पोतदार
शुक्रवार, 31 मार्च 2017

नवी दिल्ली - आयपीएल लिलावात सर्वाधिक भाव मिळाल्यानंतर ही किंमत सार्थ ठरविण्याचे दडपण आहे. खास करून रायझिंग पुणे सुपरजायंट या फ्रॅंचायजीच्या अपेक्षा सार्थ ठरवाव्या लागतील. त्यासाठी मी कसून पूर्वतयारी केली असून, कारकिर्दीत प्रथमच या बहुचर्चित स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झालो आहे, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्‍स याने व्यक्त केली. 

नवी दिल्ली - आयपीएल लिलावात सर्वाधिक भाव मिळाल्यानंतर ही किंमत सार्थ ठरविण्याचे दडपण आहे. खास करून रायझिंग पुणे सुपरजायंट या फ्रॅंचायजीच्या अपेक्षा सार्थ ठरवाव्या लागतील. त्यासाठी मी कसून पूर्वतयारी केली असून, कारकिर्दीत प्रथमच या बहुचर्चित स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झालो आहे, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्‍स याने व्यक्त केली. 

येथील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टोक्‍सला पुणे संघाचे मालक संजीव गोयंका यांच्या हस्ते ५५ नंबरची जर्सी प्रदान करण्यात आली. नवनियुक्त कर्णधार स्टीव स्मिथ आणि वरिष्ठ खेळाडू अजिंक्‍य रहाणे या वेळी उपस्थित होते. याबरोबरच पुणे संघाने आयपीएलसाठी सज्ज असल्याचे रणशिंग फुंकले.

स्टोक्‍सला लिलावात सर्वाधिक किंमत मिळाली. इंग्लंडमधील स्थानिक स्पर्धा आणि आयपीएल यातील फरकाविषयी तो म्हणाला की, आयपीएलमध्ये खेळून आलेले माझे देशबांधव फार भारावून गेले आहेत. इंग्लंडमध्ये आम्हाला हे क्रिकेट खेळण्याची फारशी संधी मिळत नाही. मुख्य म्हणजे आयपीएलमध्ये जगातील अनेक प्रमुख खेळाडू सहभागी होतात. तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधता येतो. इतर स्पर्धांमध्ये अशी संधी मिळत नाही. साहजिकच आयपीएल खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.

धोनीवरून चर्चा
पुण्याने आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार अशी गणना झालेल्या महेंद्रसिंह धोनीला हटवून स्मिथकडे नेतृत्व सोपविले. या कार्यक्रमाला धोनी उपस्थित नव्हता, पण त्याच्यावरून बरेच प्रश्न विचारण्यात आले. गोयंका यांनी नवा गडी-नवा राज या उक्तीला अनुसरून नवा मोसम-नवा कर्णधार अशी मुत्सद्देगिरीची टिप्पणी केली. धोनीविषयी सदैव आदर वाटतो आणि वाटत राहील. तो एक बुद्धिमान क्रिकेटपटू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मालिका इतिहासजमा
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान अनेकदा धुमश्‍चक्री उडाली; पण आता ही मालिका इतिहासजमा झाल्याचे स्मिथने वारंवार नमूद करून आयपीएलसाठी सज्ज झाल्याचे सांगितले. कर्णधार आणि खेळाडू म्हणून आयपीएलमधून खूप काही शिकायला मिळाले. या स्पर्धेत खेळायला मिळणे, हा एक बहुमान असल्याची भावना त्याने व्यक्त केली.

हा कार्यक्रम आयपीएलसंदर्भात असला तरी कसोटी मालिकेच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले गेले. त्यास व्यासपीठावरील उपस्थितांनी थेट बगल न देता मुत्सद्देगिरीचे भाष्य केले. रहाणेने सांगितले, की धरमशाला कसोटीत माझ्या नेतृत्वाखाली विजय मिळाला असला आणि नेतृत्वाची शैली वेगळी असली, तरी विराटने कर्णधार म्हणून सुरेख कामगिरी बजावली आहे. एकाग्रतेने खेळताना माझी सर्वोत्तम कामगिरी होते, तर विराट भावभावना व्यक्त करून सर्वोच्च क्षमता प्रदर्शित करतो.

विराटने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंबरोबरील मैत्री संपुष्टात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर केवळ दोन खेळाडू वगळता इतरांना हे लागू नसल्याचा खुलासाही केला. यातील एक खेळाडू तू असल्याचे वाटते का, असा प्रश्न स्मिथला विचारण्यात आला. त्यावर स्मिथने, हा प्रश्न विराटलाच विचारणे योग्य ठरेल, असे उत्तर दिले. संघात वेगवेगळ्या देशांचे कर्णधार असणे जमेची बाजू असल्याचेही स्मिथ म्हणाला.

कसोटी मालिका तसेच एरवीची कडवी चुरस बाजूला ठेवून आयपीएलसाठी वेगवेगळ्या देशांचे खेळाडू आपल्या संघासाठी एकत्र येतील, असा ठाम विश्वास गोयंका यांनी व्यक्त केला.

रहाणेने सांगितले की, मी कोणतेही टार्गेट ठरवित नाही. चॅंपियन्स करंडक स्पर्धेला अजून दोन महिने आहेत. कसोटी मालिकेनंतर आयपीएलवर लक्ष केंद्रित केले असून वैयक्तिक पातळीवर सर्वोत्तम कामगिरीचा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला.

पुणेकर प्रेक्षक दर्दी
रायझिंग पुणे सुपरजायंटचे मालक संजीव गोयंका यांनी यंदाच्या मोसमातील सर्व सात सामने गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळण्याची अपेक्षा बाळगली आहे. गेल्या मोसमात चारच सामने खेळायला मिळाले तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद भारावून टाकणारा होता. पुणेकर प्रेक्षक दर्दी आहेत. त्यांना चुरशीने खेळ करून मनोरंजनाची पर्वणी देऊ. त्यासाठी संघ सक्षम बनला आहे, असे त्यांनी नमूद केले.

आयपीएलच्या निमित्ताने स्मिथच्या तंत्र आणि शैलीची हेरगिरी करावी आणि ॲशेस मालिकेत त्याचा फायदा उठवावा, असा सल्ला ज्यो रूट याने स्टोक्‍सला दिला आहे. पण एका संघाकडून खेळताना हे करता येणे शक्‍य नसल्याचे स्टोक्‍सने नमूद केले.