चेन्नई, गोवा, केरळ, पुणे उपांत्य फेरीत

चेन्नई, गोवा, केरळ, पुणे उपांत्य फेरीत

गडहिंग्लज - येथील युनायटेड करंडक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी चेन्नईचा एजीएस, गोव्याचा सेसा अकादमी, एफसी केरला आणि पुण्याचा बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) यांनी विजय नोंदवून उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला.

झुंजार खेळ करणाऱ्या बंगळूरचा डीवायएसएस, कोल्हापूरचा प्रॅक्‍टीस, पुण्याचा सीटीएफसी आणि यजमान गडहिंग्लज युनायटेडचे आव्हान संपुष्टात आले. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.

दुपारच्या सत्रातील रोमांचक सामन्यात गोव्याच्या सेसा अकादमीने पुण्याच्या सीटीएफसीला एका गोलने हरविले. खेळात जम बसण्यापूर्वीच गोव्याच्या कुणाल साळगावकरने मैदानी गोल करून पुण्याच्या संघाला धक्का दिला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे संघाने एका पाठोपाठ चढाया करून गोल फेडण्यासाठी आक्रमणावर भर दिला. परंतु गोव्याचा गोलरक्षक रौनल गावकर याने अभेद्य भिंतीप्रमाणे गोल जाळ्यासमोर उभारून हल्ले परतविले. उत्तरार्धातही पुण्याच्या मोईरंग ओंगयामने गोलरक्षक एकटा असतानाही गोल करण्याची सुवर्णसंधी दवडून निराशा केली. पुण्याच्याच ओमेगा वनलवंगानने मारलेला उत्कृष्ठ फटका गोव्याच्या गोलरक्षकाने अडवून बरोबरीचे मनसुबे उधळून लावले. 

रंगतदार सामन्यात एफसी केरलाने यजमान युनायटेडवर एका गोलने मात करून उपांत्यफेरी गाठली. संपूर्णवेळ चुरशीचा झालेल्या या सामन्यात अनुभवी व्यावसायिक खेळाडूंचा भरणार असणाऱ्या केरला संघाविरूद्ध स्थानिक युनायटेडच्या खेळाडूंनी चांगली लढत दिली. केरलाचा आघाडीपट्टू कॅरेबेरने मारलेला सोपा फटका अडवण्यात युनायटेडचा गोलरक्षक निखील खन्नाने ढिलाई केल्याने चेंडू अनपेक्षितपणे गोलजाळ्यात गेला. त्यानंतर गोल फेडण्यासाठी युनायटेडच्या ओंकार जाधव, संदीप गोंधळी, यासीन नदाफ, शकील पटेल यांनी चढायांचा सपाटा लावला. परंतु केरलाच्या परदेशी बचावपटूंनी चिवट खेळ करून युनायटेडचे हल्ले परतवले. युनायटेडच्या सौरभ पाटीलचा उत्कृष्ठ हेडर गोल खांबावरून गेला. समन्वय ठेवत सातत्याने चेंडू केरलाच्या गोलक्षेत्रात ठेवूनही दिशाहीन फटक्‍यामुळे गोलची परतफेड होवू शकली नाही. 

चेन्नईच्या अनुभवी एजीएसने बंगळूरच्या डीवायएसएसला एका गोलने नमवून उपांत्यफेरीत प्रवेश केला. चेन्नईच्या तुलनेत युवा खेळाडूंचा समावेश असणाऱ्या डिवायएसएसने बहारदार खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकली. उत्तरार्धात चेन्नईचा स्ट्रायकर रिगनने संधीचा फायदा उठवत मैदानी महत्वपूर्ण गोलची नोंद केली. त्यानंतर बचावावर भर देवून चेन्नईने उपांत्यफेरीतील स्थान निश्‍चित केले. पुण्याच्या बीईजीने सडनडेथवर कोल्हापूरच्या प्रॅक्‍टीस क्‍लबला 5-3 असे नमविले. पूर्णवेळेत सामना गोल शून्य बरोबरीत होता. ट्रायब्रेकरमध्येही सामना बरोबरीतच राहिला. पुण्याचा गोलरक्षक अरूणदास याने पेनल्टीचे दोन फटके अडवून विजयाचा शिल्पकार ठरला. पुण्याचा निमयसिंग, रमेशसिंग, सोमरजितसिंग, जोरवारसिंग, राहिनसिंग यांनी तर कोल्हापूरच्या गणेश दाते, प्रतिक बदामे, राहूल पाटील यांनाच गोल करता आले. सुधाकर (चेन्नई), मावीया (बीईजी), रौनल गावकर (गोवा), माईक (केरळा), शरणकुमार (बंगळूर), राहूल पाटील (प्रॅक्‍टीस), मोईरंग (पुणे सीटी), मयूर पाटील (युनायटेड) यांचा उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरव झाला. 

जिगरबाज खेळाला दाद
आजच्या दिवसभरातील चारही सामने उत्कंठावर्धक झाले. बंगळूर, पुणे सीटीएफसी व गडहिंग्लज युनायटेड या संघांना केवळ एका गोलने हार पत्करावी लागली. कोल्हापूरचा प्रॅक्‍टीस क्‍लब सडनडेथवर बीईजी संघाकडून हरला. सर्वच सामन्यात पराभूत संघांनी जिगरबाज खेळ करून उपस्थितांची वाहवा मिळविली. परिणामी दिवसभर एम. आर. हायस्कूलचे मैदान शौकीनांनी तुडूंब भरले होते. 

उद्या (सोमवारी) होणारे उपांत्यफेरीचे सामने
- चेन्नई एजीएस विरूद्ध बीईजी पुणे : दु. 1.00 वाजता.
- सेसा गोवा विरूद्ध एफसी केरला : दु. 3.00 वाजता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com