मॅंचेस्टर युनायटेडने लीग कप जिंकला

मॅंचेस्टर युनायटेडने लीग कप जिंकला

लंडन - इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये पहिल्या चार संघांत स्थान नसले तरी माजी विजेत्या मॅंचेस्टर युनायटेडने यंदाच्या मोसमात लीग करंडकांची कमाई केली. चुरशीच्या अंतिम सामन्यात साउथदम्टनचा ३-२ असा पराभव केला. झाल्टन इब्राहिमोविकने अखेरच्या क्षणी केलेला गोल निर्णायक ठरला. प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांचे युनायटेडशी नाते जुळल्यानंतर हे पहिले यश आहे.

मॅंचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक झाल्यानंतर खेळाडूंना करारबद्ध करण्याच्या मुदतीच्या अखेरच्या क्षणी मॉरिन्हो यांनी स्वीडनचा स्टार असलेल्या मॉरिन्होला युनायटेडमध्ये आणले. त्यांचा हा विश्‍वास इब्राहिमोविकने सार्थ ठरवला आणि त्यांना विजेतेपदाची भेट दिली.

या अंतिम सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडकडून करण्यात आलेल्या तीनपैकी दोन गोल इब्राहिमोविकचे आहेत. ३५ वर्षीय या स्टार खेळाडूने फ्री किकवर शानदार गोल करून युनायटेडचे खाते उघडले. त्यानंतर जेस लिंगार्डने ही आघाडी वाढवली. साउदम्टनच्या मानोलो गॅबिदिनीने मध्यंतराच्या अगोदर आणि मध्यंतरानंतर लगेचच दोन गोल करून सामन्यात रंग भरले आणि चुरसही वाढवली. २-२ अशा बरोबरीनंतर ८७ व्या मिनिटाला इब्राहिमोविकने निर्णायक हेडर केला. त्याचा यंदाच्या मोसमातला हा २६ वा गोल आहे. आपल्या पहिल्याच मोसमात लीग करंडक जिंकणारे मॉरिन्हो हे मॅंचेस्टर युनायटेडचे पहिले प्रशिक्षक ठरले. अशी कामगिरी मॅंचेस्टरचे माजी दिग्गज प्रशिक्षक अलेक्‍स फर्ग्युसन किंवा मॅट बुसबे यांनाही करता आलेली नाही.

मॅंचेस्टर युनायटेड प्रीमियर लीगमध्ये २५ सामन्यांतील ४८ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. लीग कपमधील या विजेतेपदामुळे मॉरिन्हो यांचे स्थान या मोसमासाठी तरी बळकट झाले आहे. प्लेमेकर हेन्‍रिक मेखेत्रेयनची दुखापतीमुळे अनुपस्थिती आणि वेन रुनीला पुन्हा राखीव खेळाडूंत देण्यात आलेले स्थान यामुळे मॅंचेस्टर युनायटेडची सर्व मदार इब्राहिमोविकवर होती. आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्याने थोडाही वेळ लावला नाही.

लीग कपचे विजेतेपद मिळवले असले तरी आमची भूक मोठी आहे. या विजेतेपदामुळे माझा मॅंचेस्टर युनायटेडशी करार आणखी एका वर्षाने वाढू शकेल, त्यामुळे अजून चांगल्या यशाची अपेक्षा करायला हरकत नाही. माझ्यासाठी हा पहिला मोसम सोपा नसणार याची कल्पना होती, पण आणखी यश मिळवण्यासाठी अधिक चांगला खेळ करायला हवा.
- जोस मॉरिन्हो, मॅंचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com