पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान; बांगलादेशविरुद्ध भारताचा दणदणीत विजय

टीम ई सकाळ
गुरुवार, 15 जून 2017

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात रोहित शर्माचे नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद 96 धावांच्या बळावर भारताने बांगलादेशविरुद्ध नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळविला आहे. आता भारताचा अंतिम सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

बर्मिंगहॅम - चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात रोहित शर्माचे नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद 96 धावांच्या बळावर भारताने बांगलादेशविरुद्ध नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळविला आहे. आता भारताचा अंतिम सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

आज (गुरुवार) भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात आज बांगलादेशने भारतापुढे 265 धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर तमीम इक्‍बाल (70 धावा, 82 चेंडू) व मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज मुशफिकूर रहीम (61 धावा, 85 चेंडू) यांच्यात झालेली शतकी भागीदारी हे बांगलादेशच्या धावसंख्येमधील प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भारताच्या वतीने भुवनेश्‍वर कुमार, जसप्रित बुमराह आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर रविंद्र जडेजा याने एक बळी घेतला.

265 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या भारताने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आघाडीच्या फलंदाजांनी 87 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मोर्तझाने शिखर धवनचा (34 चेंडूत 46) बळी घेतला. मात्र त्यानंतर बांगलादेशला अखेरपर्यंत सूर गवसला नाही. रोहित शर्माने 129 चेंडूत एक षटकार आणि 15 चौकारांसह 123 धावा केल्या. तर विराट कोहलीनेही 13 चौकारांसह 78 चेंडूत 96 धावा केल्या. अवघ्या 40.1 षटकातच भारताने विजयाला आपलेसे केले.

■ अंतिम धावफलक
बांगलादेश ५० षटकात ७ बाद २६४ धावा
भारत  ४०. १ षटकात १ बाद २६५ धावा