रेस ड्रायव्हर ध्रुवचा धडाका

गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

रेसिंगमध्ये कंपन्यांपासून विजेत्यांपर्यंत दाक्षिणात्य वर्चस्व असले तरी महाराष्ट्राचे अस्तित्व अधोरेखित होऊ लागले आहे. राष्ट्रीय रेसिंग मालिकेत फोक्सवॅगनच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे चीज करीत आणखी एक मराठी विजेता उदयास आला. मुळ कोल्हापूरचा आणि पुण्यात शिकणारा ध्रुव मोहिते देशातील सर्वाधिक जुन्या रेसट्रॅकवर पदार्पणात विजेता ठरला.

रेसिंगमध्ये सर्वोच्च पातळीवर पहिल्यावहिल्या विजयाची नव्हे तर नुसत्या पहिल्या गुणाची प्रतिक्षा प्रदिर्घ असू शकते.अशावेळी एखादा रेस ड्रायव्हर आव्हानात्मक ट्रॅकवर पदार्पणात शर्यत जिंकतो तेव्हा तो कौतुकाचा विषय ठरतो. त्यातून त्या रेसिंग मालिकेचे यश सुद्धा अधोरेखित होते. राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील अॅमीओ करंडक स्पर्धेत मुळच्या कोल्हापूरच्या तसेच पुण्यात सिंबायोसिसमध्ये शिकणाऱ्या ध्रुव मोहीते या विद्यार्थ्याने अशीच कामगिरी केली आहे. त्याने चेन्नईजवळील मद्रास मोटर स्पोर्टस क्लबच्या सर्कीटवर पदार्पणात शर्यत जिंकली. त्यानंतरच्या फेरीत त्याने दोन वेळा तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे आयोजन फोक्सवॅगन मोटरस्पोर्टस इंडियाच्यावतीने केले जाते. या मालिकेने गेल्या वर्षी औरंगाबादचा नीरंजन तोडकरी आणि त्याआधी मुंबईचा अमेय वालावलकर असे मराठी विजेते घडविले. याशिवाय मुंबईच्या आदित्य पवारने सुद्धा व्हेंटो करंडक मालिकेत एकदा करंंडक मिळविला. त्यापाठोपाठ ध्रुवने या पंक्तीत स्थान मिळविले.

तसे पाहिले तर ध्रुवच्या रक्तातच रेसिंग आहे. कोल्हापूरजवळील हुपरी येथे त्याचे वडील शिवाजीराव यांनी रेसिंग ट्रॅक बांधला आहे. तेथे गोकार्टमधून ध्रुवने श्रीगणेशा केला. त्यानंतर त्याने विविध मालिकांत भाग घेतला. त्याची विजयाची प्रतिक्षा मात्र अॅमीओ करंडक मालिकेत पूर्ण झाली. आपल्या मुलाच्या यशाचे साक्षीदार झालेल्या शिवाजीराव यांना ड्रायव्हर घडविण्याचा पद्धतशीर  उपक्रम महत्त्वाचा वाटतो. त्यांनी सांगितले की, सिंगल सिटर मालिकांत ध्रुवने भाग घेतला, पण त्याच्या गुणवत्तेचे कामगिरीत रुपांतर होत नव्हते. फोक्सवॅगनच्या निवड चाचणीला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. त्यात निवड झाल्यानंतर ध्रुवने संधीचे सोने केले. ही वन-मेक सिरीज आहे. याचा अर्थ इथे सर्व ड्रायव्हरना समान क्षमतेच्या आणि तांत्रिकदृष्ट्या सारख्याच पद्धतीने सक्षम केलेल्या कार दिल्या जातात. मालिकेपूर्वी तंदुरुस्ती, आहार, अशा गोष्टींकडे लक्ष पुरविले जाते. सलून कारमधील ध्रुवचे यश नक्कीच आनंददायक आहे.

ध्रुवच्या आई मोनिका यांना विजय आणि पर्यायाने करंडकापेक्षा खेळाच्या माध्यमातून होणारा व्यक्तीमत्त्व विकास जास्त मोलाचा वाटतो. ध्रुवमध्ये शिकण्याची वृत्ती आहे. काही अनुभवी आणि काही नवोदीत स्पर्धकांचा सहभाग असताना त्याने आघाडीवर असूनही अवास्तव धोका पत्करला नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याने ट्रॅकवर चूक केली नाही.

श्रीपेरंबुदूर येथील रेसट्रॅकचे 1979 मध्ये उद्घाटन झाले. मद्रास मोटर स्पोर्टस क्लबच्या या ट्रॅकला 2015 मध्ये जीपी2 (ग्रांप्री 2) हा दर्जा मिळाला. जीपी2 हा आकड्याप्रमाणेच रेसिंगमधील दुसऱ्या क्रमांकाचा दर्जा आहे. या ट्रॅकवर स्पर्धकांचे तांत्रिक कौशल्यच नव्हे तर परिपक्वता आणि दृष्टिकोन सुद्धा पणास लागतो. रेसिंगमध्ये एकाच ट्रॅकवर पाठोपाठच्या फेऱ्यांत प्रत्येक वळणावर ठराविक वेगाने, ठराविक गिअरमध्ये फेऱ्या (लॅप) पूर्ण कराव्या लागतात. शर्यतीच्यावेळी फेरीगणिक चित्र बदलत असते. अशावेळी ध्रुवने पाठोपाठच्या फेऱ्यांत करंडक जिंकणे कौतुकास्पद ठरते. ही कामगिरी त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरली आहे. त्याचे यश महाराष्ट्राच्या रेसिंगमधील माईलस्टोन ठरले आहे.