'खेळाडूंपेक्षा खेळच श्रेष्ठ'

sachin-anjali
sachin-anjali

मुंबई - खेळाडू कधीही खेळापेक्षा मोठा नसतो, खेळाचा आदर करा, मग खेळ तुमची काळजी घेईल, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या ४५ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले. खेळाडू म्हणून घडवण्यात ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतलेली असते, त्यांची जाणीव ठेवा. इतकेच नव्हे तर प्रतिस्पर्ध्यांचाही आदर करा, असेही सचिन म्हणाला.

निमित्त होते भारतीय क्रिकेटवरील एका पुस्तक प्रकाशनाचे आणि त्यात सचिनचा वाढदिवस आदल्या दिवशीच साजरा झाला. त्या वेळी पत्नी अंजलीही उपस्थित होती. सचिनच्या निवासस्थानापासून थोडेच दूर असलेल्या वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा झाला. 

सचिनसह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्क उपस्थित होते. पुस्तकाच्या प्रकाशनाच्या या समारंभात विविध विषयांवर या आजी-माजी खेळाडूंनी मत व्यक्त केले; परंतु सचिनच्या वाढदिवसाच्या आठवणींनी सुरू झालेला हा कार्यक्रम केक कापून पूर्ण झाला. एरवी सचिनच्या कोणत्याही कार्यक्रमात अंजली व्यासपीठावर उपस्थित नसते; परंतु आज सचिननेच आग्रह केल्यानंतर केक कापताना ती त्याच्यासोबत होती. 

वडिलांकडे पाहून समोरच्या व्यक्तींचा आदर कसा करायचा, हे मी शिकलो. आचरेकर सरांकडून मैदानावरची शिस्त मिळाली. आपल्याला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही, हे शिकता आले. मैदानावर कितीही प्रसंग घडले तरी मैदानाबाहेर कटुता असू नये, असा अनुभव सचिनने कथन केला. 

आईला पाहून दडपण आले होते
वानखेडेवर झालेल्या माझ्या अखेरच्या सामन्यासाठी आई उपस्थित होती. थेट मैदानात उपस्थित राहून माझा ती पहिलावहिला सामना पाहत होती. मी फलंदाजी करत असताना मेगा स्क्रीनवर आई, पत्नी, भाऊ, मुले असे एकेकाला दाखवत होते, माझे त्याकडे लक्ष गेले आणि कमालीचे दडपण आले. लक्ष विचलित होऊन बाद व्हायचे नव्हते, त्यामुळे कधी नव्हे इतके दडपण माझ्यावर आले होते, अशी आठवण सचिनने सांगितली.

विराटला ५० शॅम्पेन  घेऊन जाईन
सचिनला गुरुस्थानी मानून क्रिकेटमध्ये विराट झेप घेत असलेला कोहली लवकरच सचिनच्या ४९ शतकांचा विक्रम मोडेल, या वेळी तू त्याचे अभिनंदन कसे करशील, यावर सचिनने मी त्याच्यासाठी ५० शॅम्पेन घेऊन जाईन, असे हसत-हसत सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com