इराणचा अत्राचली कबड्डीचा पहिला कोट्यधीश 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 मे 2018

लीग वाढतेय, खेळाडूंचीही किंमत वाढणार 
पहिल्या प्रो कबड्डी लीगसाठी राकेश कुमारला सर्वाधिक 12.80 लाख मिळाले होते. त्या तुलनेत सहाव्या मोसमात कबड्डीपटूंनी एक कोटीची झेप घेतली आहे. "कबड्डी लीगची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे पुरस्कर्ते वाढत आहेत. फ्रॅंचाईजना जास्त रक्कम मिळत आहे, त्यामुळे तेही खेळाडूंच्या खरेदीसाठी जास्त रक्कम मोजण्यास तयार आहेत. हेच गेल्या मोसमापर्यंत दिसले, हा मोसमही त्यास अपवाद नसेल', असे अभिषेक बच्चनने सहाव्या मोसमाचा लिलाव सुरू होण्यापूर्वी सांगितले. 

मुंबई - इराणी कबड्डीपटूंचे त्यांच्या देशांपेक्षा भारतात जास्त चाहते असल्याचेच बुधवारी सिद्ध झाले. आशियाई कबड्डी स्पर्धेत फारसा प्रभाव पाडू न शकलेला फझल अत्राचली प्रो कबड्डीमधील पहिला कोट्यधीश ठरला. यू मुम्बाने सहाव्या मोसमासाठी आज झालेल्या लिलावात त्याच्यासाठी एक कोटी रुपये मोजताना जयपूर पिंक पंथर्सला मागे टाकले. 

अत्राचलीस मोठी किंमत मिळणे अनपेक्षित नव्हते. गेल्याच मोसमात त्याने पकडीचे 100 गुण नोंदवणारा पहिला परदेशी खेळाडू होण्याचा मान मिळवला होता; पण गुजरात फॉर्च्युन जायंटस्‌ने त्याला न राखण्याचे ठरवले. प्रो कबड्डीतील कामगिरीमुळे अत्राचली सर्वांच्याच "रडार'वर होता. प्रत्यक्षात लिलावात अखेर पर्यंत मुम्बासह जयपूर शर्यतीत राहिले होते. 

यू मुम्बाने अत्राचलीच नव्हे, तर इराणी खेळाडू मिळवण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा केली. त्यांनी हादी ताजिक (11 लाख) आणि अबोलफझल माघसोदलोमाहाली (21.75 लाख) यांनाही पसंती दिली. बचाव भक्कम असण्यास आमची पसंती होती. त्याचबरोबर इराणचे मार्गदर्शक गोलाम राझे आता आमच्या संघासोबत आहेत. त्यामुळेच आम्ही इराण खेळाडूंना पसंती दिली, असे यू मुम्बाचे रॉनी स्क्रूवाला यांनी सांगितले. 

तेलुगू टायटन्सने इराणच्याच अबोझार मोहजेरमिघानी याच्यासाठी पाऊण कोटी मोजून दिले. तो सर्वाधिक महागडा आक्रमक ठरला. तर हरियाना स्टीलर्सने कोरियाच्या जान कुन ली याच्यासाठी सर्वाधिक 33 लाख मोजण्याची तयारी दाखवल्यावर बंगाल वॉरियर्सने फायनल बीच मॅच कार्ड वापरून त्याला आपल्याकडे राखले. 

लीग वाढतेय, खेळाडूंचीही किंमत वाढणार 
पहिल्या प्रो कबड्डी लीगसाठी राकेश कुमारला सर्वाधिक 12.80 लाख मिळाले होते. त्या तुलनेत सहाव्या मोसमात कबड्डीपटूंनी एक कोटीची झेप घेतली आहे. "कबड्डी लीगची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे पुरस्कर्ते वाढत आहेत. फ्रॅंचाईजना जास्त रक्कम मिळत आहे, त्यामुळे तेही खेळाडूंच्या खरेदीसाठी जास्त रक्कम मोजण्यास तयार आहेत. हेच गेल्या मोसमापर्यंत दिसले, हा मोसमही त्यास अपवाद नसेल', असे अभिषेक बच्चनने सहाव्या मोसमाचा लिलाव सुरू होण्यापूर्वी सांगितले. 

प्रो कबड्डी लीगमध्ये बचाव महत्त्वाचा असतो. आम्हाला बचाव भक्कम करायचा होता, त्यामुळेच आम्ही अत्राचलीला पसंती दिली. तो यापूर्वी आमच्याकडून खेळला आहे. त्याचाही आम्हाला फायदा होईल. 
- रॉनी स्क्रूवाला, यू मुम्बा 

यू मुम्बा हे माझे जणू दुसरे घर आहे. त्यामुळे मी खूपच आनंदित आहे. नव्या करारावर मी खूपच खूष आहे. मी खूप खूप आनंदित आहे. 
- फाझल अत्राचली 

Web Title: pro kabbadi leage Auction