बॉक्‍सर अक्षयला ‘डोर्फ केटल केमिकल्स’ची साथ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सुवर्ण लक्ष्य साधण्यासाठी आहारासह प्रशिक्षणाचा सर्व खर्च उचलणार

पुणे - प्रतिकूल परिस्थितीला ‘पंच’ देऊन बॉक्‍सिंगमध्ये कारकीर्द उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेला पुण्यातील उदयोन्मुख बॉक्‍सिंग खेळाडू अक्षय मरे याला डोर्फ केमिकल्स इंडिया प्रा. लि. या कंपनीने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

सुवर्ण लक्ष्य साधण्यासाठी आहारासह प्रशिक्षणाचा सर्व खर्च उचलणार

पुणे - प्रतिकूल परिस्थितीला ‘पंच’ देऊन बॉक्‍सिंगमध्ये कारकीर्द उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेला पुण्यातील उदयोन्मुख बॉक्‍सिंग खेळाडू अक्षय मरे याला डोर्फ केमिकल्स इंडिया प्रा. लि. या कंपनीने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

‘गरिबीला ‘पंच’ देत अक्षयचे सुवर्ण लक्ष्य’ ही अक्षयच्या प्रयत्नांची दखल घेणारी बातमी दै. ‘सकाळ’ने १२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दखल घेत कंपनीचे क्रीडा समन्वयक म्हणून काम पाहणारे संजय दुधाणे यांनी कंपनीचे  ‘सीएसआर’ प्रमुख संतोष जगधने यांचे या वृत्ताकडे लक्ष वेधले. त्यानंतर वेगाने चक्रे फिरून जगधने यांनी कंपनीचे प्रमुख सुभाष मेनन यांच्याशी चर्चा करून मरेला दत्तक घेण्याचे निश्‍चित केले. 

जगधने यांनी दुधाणे यांच्यासह सोमवारी (ता. १८) मरे याच्या घरी जाऊन त्याला पुरस्कृत करत असल्याचे पत्र दिले. त्या वेळी त्याला बॉक्‍सिंग ग्लोव्ह्‌जही भेट देण्यात आले. करारानुसार कंपनी अक्षयचा आहारासह प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च कंपनी करणार आहे. त्याचबरोबर त्याला दरमहा दहा हजार रुपये विद्या वेतनही देण्यात येणार आहे. कंपनीने त्याच्या प्रशिक्षण केंद्राचीही पाहणी करून प्रशिक्षक विजय गुजर यांची भेट घेऊन त्याच्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यास सांगितले आहे. जगधने म्हणाले, ‘‘अक्षयकडे गुणवत्ता असल्यामुळेच आम्ही त्याला तातडीने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तो राष्ट्रीय पदकापर्यंत पोचला आहे. आता राष्ट्रीय स्पर्धेत पदकाचा रंग बदलण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठीच आम्ही त्याला मदत करत आहोत आणि तो हा पल्लाही गाठेल याचा आम्हाला विश्‍वास वाटतो.’’ 

कंपनीने आतापर्यंत नेमबाजी, बॉक्‍सिंग, तिरंदाजी आणि कुस्ती खेळाडूंना पुरस्कृत केले आहे. खेळाडूंना वेळीच मदत मिळाली, तर त्यांची  कारकीर्द घडण्यास मदत होते हाच यामागील हेतू असल्याचेही जगधने यांनी सांगितले.

कंपनीने दत्तक घेतलेले खेळाडू 
    कोल्हापूरची महिला कुस्तीगीर नंदिनी साळुंके, स्वाती शिंदे
    साताऱ्याची तिरंदाज स्नेहल मांढरे
    दिव्यांग खेळाडू आदिल अन्सारी
    तीरंदाज हरीश कांबळे
    मेरी कोमच्या इम्फाळ येथील बॉक्‍सिंग ॲकॅडमीतील दोन खेळाडू

याखेरीज कंपनीने आतापर्यंत कुस्तीपटू रेश्‍मा माने, तिरंदाज प्रवीण जाधव, तन्मय मालुसरे, संकेत पाष्टे यांना पुरस्कृत केले आहे. 

इतकी वर्षे अक्षय खेळतोयं. पण त्याच्याकडे कुणाचे लक्ष गेले नव्हते. आमच्यापेक्षा त्याच्या आयुष्याला या घटनेने वेगळे वळण मिळेल. तो देशाचे नाव उंचावल्याशिवाय राहणार नाही. 
- सुनीता मरे, अक्षयची आई

दै. ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेत मला ही मदत मिळाली. ‘सकाळ’ आणि कंपनीचा मी आभारी आहे. आता अधिक मेहनत घेऊन देशाची मान उंचावण्यासाठी खेळणार.
- अक्षय मरे