सिंधूला कोरिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद

वृत्तसंस्था
रविवार, 17 सप्टेंबर 2017

सोलमधील उपांत्य लढतीत सिंधूने जागतिक क्रमवारीत सातव्या असलेल्या हे बिंगजिओ हिचे आव्हान 21-10, 17-21, 21-16 असे परतावून लावत अंतिम फेरी गाठली होती. सिंधूकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. तिने अपेक्षानुसार कामगिरी करत विजय मिळविला.

सोल : ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. सिंधूने अंतिम सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत जागतिक स्पर्धेतील पराभवाचा बदला घेतला.

कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदासाठी या दोघींमध्ये आज लढत झाला. सिंधूने ओकुहाराचा 22-20, 11-21, 21-18 असा तीन गेममध्ये पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तीन आठवड्यांपूर्वी या दोघींमध्ये ग्लास्गोत जागतिक स्पर्धेत अंतिम लढत झाली होती. एका तासापेक्षा जास्त रंगलेल्या या लढतीत ओकुहाराने विजय मिळविला होता. आता या पराभवाचा बदला घेत सिंधूने ओकुहाराचा तीन गेममध्ये पराभव केला.  

सोलमधील उपांत्य लढतीत सिंधूने जागतिक क्रमवारीत सातव्या असलेल्या हे बिंगजिओ हिचे आव्हान 21-10, 17-21, 21-16 असे परतावून लावत अंतिम फेरी गाठली होती. सिंधूकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. तिने अपेक्षानुसार कामगिरी करत विजय मिळविला. ओकुहाराला सलग तिसरे विजेतेपद मिळविण्यात अपयश आले. ओकुहाराने ऑस्ट्रेलियन, तसेच जागतिक स्पर्धेतील अंतिम लढती जिंकल्या आहेत.