सरकारकडे दाद मागण्याचा रामचंद्रन यांचा पवित्रा 

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बरखास्तीची कारवाई केल्यानंतर अखेर भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी मौन सोडले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (आयओसी) आणि आशियाई ऑलिंपिक कौन्सिल (ओसीए) यांच्याशी सल्लामसलत करून सरकारकडे दाद मागू, असे त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बरखास्तीची कारवाई केल्यानंतर अखेर भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी मौन सोडले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (आयओसी) आणि आशियाई ऑलिंपिक कौन्सिल (ओसीए) यांच्याशी सल्लामसलत करून सरकारकडे दाद मागू, असे त्यांनी सांगितले. 

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले क्रीडा संघटक सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची अजीव अध्यक्षपदी केलेली नियुक्ती रद्द करीत नाही तोपर्यंत बरखास्ती कायम राहील, असे मंत्रालयाने बजावले आहे. या नियुक्‍त्या जाहीर होताच मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यास उत्तर देण्याची मुदत शुक्रवारी पाच वाजता संपली. तोपर्यंत रामचंद्रन यांनी कोणतेही भाष्य केले नव्हते, तर ते न्यूझीलंडमध्ये असल्यामुळे 15 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. 

शनिवारी रामचंद्रन यांनी अखेर एक निवेदन जारी केले. त्यांनी म्हटले आहे की, 'माझ्या कुटुंबाशी संबंधित वैयक्तिक कारणामुळे मी न्यूझीलंडमध्ये आहे. श्री. कलमाडी आणि श्री. चौटाला यांना अजीव अध्यक्षपद बहाल केल्याबद्दल सरकारने 'आयओए' बरखास्त केल्याचे मला समजले आहे. 'आयओए'ला 'ओसीए' आणि 'आयओसी' या संघटनांच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली कारभार करावा लागतो. नव्या वर्षात मायदेशी परतल्यानंतर या दोन संघटनांच्या कार्यालयांशी संपर्क साधून मी चर्चा करेन. त्यांचा सल्ला घेईन आणि मग सरकारकडे हे प्रकरण नेऊन काय तोडगा निघतो हे पाहीन.' 

बिंद्राचा बरखास्तीला पाठिंबा 
ऑलिंपियन नेमबाज अभिनव बिंद्रा याने 'आयओए' बरखास्त करण्याच्या क्रीडा मंत्रालयाचे स्वागत करून यास पाठिंबा दिला. त्याने ट्विट केले की, 'विजय गोयल यांनी चांगले पाऊल टाकले आहे. ऑलिंपिक चळवळ आणि खास करून भारतातील चळवळ स्वायत्ततेच्या आड लपू शकणार नाही. चांगले प्रशासन आणि नीतिमूल्यांचे हे युग आहे. असे हुकूम निघाले तरच भारतीय क्रीडा क्षेत्रात बदल होईल. भारतात कायदा होण्याची गरज आहे.'

Web Title: Ramchandran to appeal against IOA suspension