मनोहर यांचा आयसीसी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई/दुबई - दोन वर्षांची टर्म असतानाही आठ महिन्यांतच शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारण असल्याचे मनोहर यांनी सांगितले असले, तरी आयसीसीमधील आर्थिक सुधारणांच्या त्यांच्या प्रयत्नांना भारतीय मंडळाकडून विरोध होत असल्याचे कारण देण्यात येत आहे.

मुंबई/दुबई - दोन वर्षांची टर्म असतानाही आठ महिन्यांतच शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारण असल्याचे मनोहर यांनी सांगितले असले, तरी आयसीसीमधील आर्थिक सुधारणांच्या त्यांच्या प्रयत्नांना भारतीय मंडळाकडून विरोध होत असल्याचे कारण देण्यात येत आहे.

मनोहर यांनी आपला राजीनामा आयसीसीचे कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांच्याकडे ई-मेल केला; परंतु त्यांनी यामागचे निश्‍चित कारण स्पष्ट केले नाही. आयसीसीकडूनही मनोहर यांच्या राजीनाम्याची कबुली दिली आहे.

आयसीसीच्या कामकाजातील कार्यपद्धतीत बदल करण्यासाठी मनोहर प्रयत्नशील होते. अशा परिस्थितीत त्यांनी दिलेला राजीनामा धक्कादायक आहे; परंतु पदावर असताना अशाप्रकारे मध्येच पदमुक्त होण्याची त्यांची सवय असावी, असे मत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. भारतीय क्रिकेट मंडळामध्ये ते पुन्हा अध्यक्ष झाले होते, त्या वेळी लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीतून निर्माण झालेल्या अडचणीच्या वेळी त्यांची गरज होती; परंतु त्या वेळीही त्यांनी पद सोडले होते, अशी नाराजीही या पदाधिकाऱ्याने मांडली.

आयसीसीच्या नफ्याची विभागणीचा "बिग थ्री' (भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड) फॉर्म्युला अगोदरचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी तयार केला होता. त्यानुसार भारताला मोठी रक्कम मिळत होती; परंतु मनोहर आयसीसीचे स्वतंत्र अधिकार असलेले पहिले कार्याध्यक्ष झाल्यावर त्यांनी सर्व सदस्य देशांना समान नफ्याच्या विभागणीसाठी प्रयत्न सुरू केले होते, असा मोठा बदल करायचा असेल तर दोन तृतीयांश बहुमत लागते; परंतु बीसीसीआयने या प्रस्तावास पहिल्यापासून विरोध केला आणि बांगलादेश, श्रीलंका, झिम्बाब्वे यांना आपल्या बाजूने वळवले. आपला प्रस्ताव मागे पडू शकतो या कारणामुळे मनोहर यांनी पदावरून दूर होणे पसंत केले, अशी शक्‍यता क्रिकेट वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मनोहर गेल्या वर्षी मे महिन्यात आयसीसीच्या पहिल्यावहिल्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते. या पदावरून मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. संलग्न देशांच्या मंडळांसंदर्भात निर्णयासाठी माझ्या सर्व सहकारी संचालकांसह मी प्रामाणिक काम केले, असे मनोहर यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे; परंतु वैयक्तिक कारणामुळे आपण आता ऑगस्टमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीपासून कार्याध्यक्षपदी राहू शकत नाही. त्यामुळे मी या क्षणापासून हे पद सोडत आहे, असा उल्लेख करताना मनोहर यांनी सर्व संचालक, आयसीसीचा व्यवस्थापकीय स्टाफ यांचे आभार मानले.

Web Title: shashank manohar resign