सोळावर्षीय शेतकरीपुत्राचा एशियाडमध्ये सुवर्णवेध 

Sixteen year old farmer's son win gold
Sixteen year old farmer's son win gold

पालेमबँग : सोळावर्षीय सौरभ चौधरीने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जागतिक विजेत्या; तसेच ऑलिंपिक विजेत्यास मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकताना शेतकरीपुत्राने दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत दडपणाखाली कामगिरी उंचावली. 

सौरभने पात्रतेत 600 पैकी 586 गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला आणि त्यानंतर चार वेळचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता जॉनगॉह जिन (कोरिया) आणि दोन वेळचा जगज्जेता तामायुकी मात्सुदा (जपान) यांना अंतिम फेरीत मागे टाकताना 240.7 गुणांची स्पर्धा विक्रमी कामगिरी केली. सौरभची ही वरिष्ठ स्तरावरील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. त्याने अंतिम फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने सुरवातीस आघाडीवर असलेल्या मात्सुदाकडून चूक झाली. तो 8.9, 10.3 अशी कामगिरी अखेरच्या दोन शॉटस्‌मध्ये करीत असताना सौरभने 10.2, 10.4 गुणांचा वेध घेतला. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी केवळ छंद म्हणून नेमबाजी सुरू केलेल्या अभिषेक वर्माने याच प्रकारात ब्रॉंझ जिंकले. 

संजीव राजपूतचा रौप्यवेध 
संजीव राजपूतने पन्नास मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल विजेत्या संजीवने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकले. पात्रता फेरीत तो सातवा होता. अंतिम फेरीत नीलिंग आणि प्रोन प्रकारातील एकंदर पंधरा शॉटस्‌नंतर तो अव्वल होता. स्टॅंडिंग प्रकारात त्याची माफक पीछेहाट झाली. 
 
अखेरच्या शॉटस्‌पूर्वी सुवर्णपदकाचा विचारही करीत नव्हतो; पण रौप्य पक्के आहे. याची खात्री होती. शॉटस्‌नंतर आपण अव्वल आहोत, असे वाटले होते; पण नक्की काय घडले, याबाबत खात्री नव्हती. त्यामुळेच लगेचच आनंद कसा व्यक्त करणार. ऑलिंपिक अथवा जगज्जेत्याबरोबर लढत आहे हा विचारही कधी मनात नव्हता. केवळ तंत्रावर लक्ष केंद्रित केले 
-सौरभ चौधरी 

नेमबाजीतील प्रगती 
- तीन दिवसांच्या स्पर्धेनंतर एका सुवर्णपदकासह सहा पदके 
- नेमबाजी क्रमवारीत चीनपाठोपाठ (7) दुसरे 
- चार वर्षांपूर्वीच्या एशियाडमध्ये नऊ पदके, त्यातील चार सांघिक प्रकारात. (सांघिक स्पर्धा या वेळी नाहीत) 
- नव्याने आलेल्या मिश्र दुहेरीत भारतास एकच पदक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com