आशियाई मोटोक्रॉसमध्ये युवराजला दुसरा क्रमांक

आशियाई मोटोक्रॉसमध्ये युवराजला दुसरा क्रमांक

पुणे - खेड शिवापूर येथील उदयोन्मुख रायडर युवराजसिंह कोंडे देशमुख याने आशियाई मोटोक्रॉस मालिकेतील दुसऱ्या फेरीत दुसरा क्रमांक मिळविला. आशियाई मालिकेत मुलांच्या ज्युनियर गटात अशी कामगिरी केलेला युवराज यंदाच्या मोसमातील भारताचा पहिलाच रायडर ठरला.

फिलिपिन्समधील पालावान प्रांतामधील प्युर्टो प्रिन्सिया सिटीमध्ये ही फेरी पार पडली. युवराजचे वडील संदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार एका फेरीत दोन शर्यती होतात. प्रत्येक शर्यतीत दोन मोटो असतात.

मालिकेतील तिसऱ्या फेरीत युवराजने तिसऱ्या फेरीच्या पहिल्या मोटोत चौथा, तर दुसऱ्या मोटोत तिसरा क्रमांक मिळविला. एकूण क्रमवारीत तो तिसरा आला. चौथ्या फेरीत त्याने पहिल्या मोटोत दुसरा व दुसऱ्यात तिसरा अशी कामगिरी केली. एकूण क्रमवारीत तो दुसरा आला. त्याने केटीएम ८५ सीसी ही बाईक चालविली. हा वयोगट १२ ते १४ वर्षांचा आहे.

युवराजने सांगितले की, ट्रॅकचे अंतर एक किलोमीटर आठशे मीटर होते. हा ट्रॅक वेगवान होता. डोंगरामध्ये वेगवेगळे अडथळे बनविण्यात आले होते. त्यामुळे हे अडथळे नैसर्गिक आणि पर्यायाने खडतर होते. त्यावर रायडरचे कौशल्य पणास लागले. चढ आणि उतारांचे प्रमाण जास्त होते. त्यातील जम्पचे अडथळे भारतातील ट्रॅकच्या तुलनेत मोठे होते. प्रत्येक वळण तीव्र होते. यातील बरीच वळणे आणि अडथळे चढावर किंवा उतारावर होते. एक मोटो १५ मिनिटांचा आणि त्यानंतर दोन फेऱ्या असे शर्यतीचे स्वरूप होते. एकूण वेळ २० मिनिटांचा होता. गुणतक्‍त्यात युवराज ८० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. फिलिपिन्सच्या डेव्हिड व्हिटेर्बो याने पहिला, तर थायलंडच्या जिराज वान्हालाकाने दुसरा क्रमांक मिळविला. 

बाईकवरून पडूनही तिसरा
चौथ्या फेरीच्या दुसऱ्या मोटोमध्ये युवराज तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने चौथ्या क्रमांकावरील रायडरवर बरीच आघाडी घेतली होती. शर्यत जिंकण्याच्या जिद्दीने त्याने वेगाने बाईक चालविली. त्याने वेगवेगळे अडथळे जम्प घेत पार केले. त्याने धाडसाने धोका पत्करला होता; पण बाईकचे पुढचे चाक पंक्‍चर झाले. त्यामुळे तो बाईकवरून पडला. तेव्हा 
तीन लॅप बाकी होते. युवराजचे दोन्ही पाय बाईकखाली अडकले होते; पण त्याने कसेबसे सावरत बाईक उचलली. 

तेव्हा तो रडत होता, कारण विजयाची संधी हुकली असे त्याला वाटत होते, पण मन खंबीर करीत त्याने बाईक उचलत ती पुन्हा सुरू केली. त्यानंतर त्याने चाक पंक्‍चर असूनही उरलेली शर्यत पूर्ण करीत तिसरा क्रमांक मिळविला. पंक्‍चर चाकामुळे त्याला वेग वाढविता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची संधी हुकली.

या मालिकेतील पुढील फेरी इंडोनेशियामध्ये होईल. त्याची तारीख अद्याप नक्की झालेली नाही. युवराज मुंबईतील अजमेरा आय-लॅंड स्पोर्टस ॲकॅडमीत माजी राष्ट्रीय विजेता रुस्तम पटेल याच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तो विमाननगरमधील सिंबायोसिस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आठवीचा विद्यार्थी आहे.

तिरंगा अन्‌ आनंदाश्रू
युवराजच्या अश्रूंचे लवकरच आनंदाश्रूंमध्ये रूपांतर झाले. एकूण गुणतक्‍त्यात तिसरा क्रमांक मिळाल्यामुळे त्याला जल्लोषाची संधी मिळाली. त्याने तिरंगा पाठीवर घेत बाईकवरून ट्रॅकला फेरी मारली. आपल्या मुलाला परदेशात तिरंगा झळकाविताना पाहून फार भारावून गेलो होतो. त्याच्या कामगिरीचा अत्यंत अभिमान वाटला, अशी प्रतिक्रिया संदीप यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com