दोन तासांत हिरावला अर्चनाचा आनंद

नरेश शेळके
सोमवार, 10 जुलै 2017

स्पर्धेत भारत प्रथमच अव्वल 
स्पर्धेत भारताने बलाढ्य चीनला मागे टाकत पदक तालिकेत प्रथमच अव्वल स्थान पटकावले. भारताने १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि १२ ब्राँझ अशा एकूण २७ पदकांसह स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. १९८३ पासून अव्वल स्थान मिळविणाऱ्या चीनला (८+७+ ५) दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

भुवनेश्‍वर - कलिंगा स्टेडियमवर आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत सर्वांच्या नजरा गतविजेत्या टिंटू लुकावर असताना तिने शर्यत अर्धवट सोडून सर्वांना निराश केले; पण त्याच वेळी मराठमोळ्या अर्चना आढावने पदार्पणातच सुवर्णपदक जिंकून सर्वांना चकित केले. पदार्पणातल्या सुवर्णपदकाने हरखून गेलेल्या अर्चनाचा आनंद मात्र दोन तासच टिकला. प्रतिस्पर्धी धावपटूंना जाणूनबुजून ढोपर मारल्याचे सिद्ध झाल्यामुळे अर्चनाला शर्यतीतून अपात्र ठरविण्यात आले. 

अर्चनाने संथ सुरवातीनंतर अखेरच्या दोनशे मीटरला वेग वाढवत श्रीलंकेच्या स्पर्धकांना मागे टाकले. तोवर टिंटूनेही शर्यत अर्धवट सोडल्याने अर्चनाला केवळ श्रीलंकेच्या धावपटूंचे आव्हान होते. दोनशे मीटरनंतर वाढवलेला वेग कायम ठेवत तिने अंतिम रेषेजवळ श्रीलंकेच्या निमाली कोंडाला मागे टाकत २ मिनिटे ०५.०० सेकंदांत अंतिम रेषा गाठत सुवर्णपदक पटकावले. निकालाची घोषणाही करण्यात आली. मात्र, श्रीलंका संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अर्चनाने धावताना आपल्या खेळाडूंस दोनदा ढोपर मारल्याची तक्रार केली. पंचांनी शर्यतीचे ‘रिप्ले’ बघितल्यानंतर अर्चनाला दोषी ठरवून तिला अपात्र ठरविल्याचा निर्णय दिला. 

अर्चनाला अपात्र ठरविण्यात आल्याने निमालीने २ मिनिटे ०५.२३ सेकंदांत सुवर्ण, तर श्रीलंकेच्याच गायतिंका तुशारीने २ मिनिटे ०५.२७ सेकंदांत रौप्यपदक जिंकले. जपानच्या फुमिका ओमिरीला ब्राँझपदक मिळाले. भारताला आजचे दुसरे सुवर्णपदक हेप्टथलॉनमध्ये स्वप्ना बर्मनने मिळवून दिले. तिने एकूण ५९४२ गुण प्राप्त केले. पूर्णिमा हेम्ब्रमला ब्रांझपदकावर समाधान मानावे लागले. व्हिक्‍टोरिया झायबकिनाने (२३.१० से.) महिलांची दोनशे मीटर शर्यत जिंकून सुवर्णपदकाची हॅटट्रिक साधली. यापूर्वी तिने १०० मीटर आणि रिले शर्यतही जिंकली आहे.  महिलांच्या थाळीफेकीत तीन भारतीय स्पर्धक असूनही एकीलाही पदक मिळविता आले नाही. महिलांच्या दहा हजार मीटर शर्यतीत भारताच्या एल. सूर्याला चौथे तर पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकणाऱ्या नाशिककर संजीवनी जाधवला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.