सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग

पीटीआय
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

ग्लासगो - पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन विजेतेपद जिंकण्यासाठी दिलेली जवळपास दोन तासांची लढत अखेर थोडक्‍यात अपुरी पडली. भारताची पहिली महिला ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती होण्याचे तिचे स्वप्न गतवर्षी ऑगस्टमध्ये अपुरे ठरले होते, तर एका वर्षांनी भारताची पहिली जागतिक बॅडमिंटन विजेती होण्याचे सिंधूचे स्वप्न अपुरे राहिले. 

ग्लासगो - पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन विजेतेपद जिंकण्यासाठी दिलेली जवळपास दोन तासांची लढत अखेर थोडक्‍यात अपुरी पडली. भारताची पहिली महिला ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती होण्याचे तिचे स्वप्न गतवर्षी ऑगस्टमध्ये अपुरे ठरले होते, तर एका वर्षांनी भारताची पहिली जागतिक बॅडमिंटन विजेती होण्याचे सिंधूचे स्वप्न अपुरे राहिले. 

उपांत्य फेरीत साईना नेहवालला तीन गेमच्या लढतीत पराभूत केलेल्या नोझोमी ओकुहाराने हिनेच भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूला पराभूत केले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर उपांत्यपूर्व लढत खेळलेली साईना ओकुहाराविरुद्ध शनिवारी संध्याकाळी पराजित झाली, तर शनिवारी मध्यरात्री दोन वाजता उपांत्य लढत जिंकलेली सिंधू अंतिम लढत शनिवारी रात्री नऊच्या सुमारास पराजित झाली. ओकुहारास दोघींविरुद्धच्या लढतीत नक्कीच अतिरिक्त विश्रांतीचा फायदा झाला. सिंधूला तिने निर्णायक लढतीत १९-२१, २२-२०, २०-२२ अशी हार पत्करण्यास भाग पाडले. 

बॅडमिंटनच नव्हे तर क्रीडारसिकांना टीव्हीवर खिळवून ठेवणारी ही लढत जागतिक विजेतेपदास साजेशीच झाली. बॅडमिंटनमध्ये एका तासाच्या पेक्षा जास्त गेलेली लढत प्रतिस्पर्ध्यांच्या क्षमतेचा कस पाहते असे म्हटले जाते, महिला एकेरीची ही अंतिम लढत ११० मिनिटे रंगली. 

सिंधूचे ताकदवान स्मॅश, तसेच ड्रॉप्स रोखण्यासाठी ओकुहारा दीर्घ रॅलीज खेळण्यास सिंधूला भाग पाडले. सिंधूने आपण यासही पुरेपूर तयार आहोत हे दाखवले. प्रतिस्पर्धी एकमेकींच्या माफक चुकीचाही पुरेपूर फायदा घेत होत्या.

प्रतिस्पर्धीपेक्षा आपण जवळपास एका फुटाने उंच आहोत हे सिंधू जाणून होती, त्यामुळेच ती जास्त उंचीचा फायदा घेत सातत्याने ड्रॉप्स आणि स्मॅश करीत होती; पण ओकुहाराने खेळाची गती कमी करताना शटल जास्त वेळ हवेत ठेवण्यास सुरवात केली. त्यामुळे सुरवातीस सिंधूकडून चुका होण्यास सुरवातही झाली होती; पण गोपीचंद यांच्या मार्गदर्शनानंतर सिंधूने रॅलीजवर तोडीस तोड खेळ करण्यास सुरवात केली. ओकुहाराने रॅलीज सुरू केल्यावर पहिल्याच गेममधील एक रॅली ३९ शॉट्‌सची झाली. 

एखादी व्यक्ती आपली क्षमता किती उच्च स्तरापर्यंत उंचावू शकतो, जागतिक स्पर्धेचे विजेतेपद खेळाडूला सर्वोत्तम कामगिरीची किती प्रेरणा देते, हे सर्व अंतिम लढतीने दिले. एखादी बॅडमिंटनची पाऊण तास चाललेली लढत ही फुटबॉलच्या कमालीच्या वेगवान लढतीपेक्षा जास्त थकवते असे म्हटले जाते, ही लढत तर जवळपास दोन तास चालली. या लढतीतील दुसऱ्या गेमचा निर्णय ७३ शॉट्‌स चाललेल्या रॅलीने झाला. ही स्पर्धा इतिहासातील सर्वांत मोठी रॅली असल्याचे सांगितले जात आहे, पण या लढतीत जेव्हा तीस ते चाळीस शॉटस्‌ची रॅली सातत्याने झाली, त्या वेळी हे अपेक्षितच मानले गेले. 

ॲक्‍सेलसेन विजेता
पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेन याने देखील पहिले विजेतेपद मिळविताना चीनच्या माजी विजेत्या लिन डॅनचा २२-२०, २१-१६ असा सहज पराभव केला. ही लढत ५४ मिनिटे चालली.

दृष्टिक्षेपात अंतिम लढत
सिंधूच्या ओकुहाराविरुद्ध यापूर्वी सहा लढती, त्यात ३-३ बरोबरी
दोघातील यापूर्वीच्या तीनपैकी दोन लढतींत सिंधूची सरशी; त्यात रिओ ऑलिंपिकच्या उपांत्य फेरीतील विजयही
दोघीतील पहिली लढत २०१२ च्या आशियाई युवा (१९ वर्षांखालील) स्पर्धेत; तर अखेरची यंदा सिंगापूर ओपनमध्ये. सिंगापूर ओपन लढतीत सिंधूची तीन गेममध्ये सरशी
दोघीही २२ वर्षांच्या. ओकुहारा जपानकडून पहिल्यांदा २०१० मध्ये खेळली; तर सिंधू २०१३ मध्ये
जागतिक बॅडमिंटनच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात ओकुहारामुळे प्रथमच जपानची खेळाडू महिला एकेरीच्या अंतिम फेरीत
महिला एकेरीची अंतिम फेरी गाठणारी सिंधू दुसरी भारतीय. यापूर्वी साईना नेहवाल 
जागतिक क्रमवारीत सिंधू चौथ्या स्थानी (सर्वोत्तम दोन), तर ओकुहारा बाराव्या (सर्वोत्तम ३)

अशी झाली लढत
पहिली गेम - सिंधूने सलग ८ गुण जिंकत ३-५ वरून ११-५ आघाडी घेतली; पण ओकुहाराने जोरदार प्रतिकार केला. पाहता - पाहता पिछाडीचे आघाडीत रूपांतर केले. निर्णायक टप्प्यातील पिछाडी भरून काढण्याचे सिंधूचे प्रयत्न थोडक्‍यात अपयशी
दुसरी गेम - सातत्याने आघाडी बदलणाऱ्या या गेमची सांगता ७३ शॉट्स चाललेल्या रॅलीने झाली, ती सिंधूने चौथा गेम पॉइंट सत्कारणी लावत. एकही इंच प्रतिस्पर्धीस देण्यास तयार नसलेल्या या प्रतिस्पर्धीत शह काटशह सुरू होते. सिंधूने सुरवातीची आघाडी गमावली होती; पण पुन्हा प्रतिकार करीत आव्हान राखले.
निर्णायक गेम - आपण जे काही बघत आहोत, ते खरच घडत आहे का, यावर विश्वास बसत नव्हता. किमान वीस शॉट्सची रॅलीच प्रत्येक गुणाचा निर्णय करीत होती. त्यात अखेर या रॅलीज करण्यास सिंधूस भाग पाडलेली ओकुहारा जिंकली.

जागतिक स्पर्धेतील भारतीय पदक विजेते
साईना नेहवाल - रौप्यपदक, महिला एकेरी (२०१५)
पी. व्ही. सिंधू - ब्राँझपदक, महिला एकेरी (२०१३ आणि २०१४)
प्रकाश पदुकोण - ब्राँझ, पुरुष एकेरी (१९८३)
ज्वाला गुत्ता - अश्‍विनी पोनप्पा - ब्राँझ, महिला दुहेरी (२०११)