लीन डॅन, चोंग वेईचा काळ संपला - श्रीकांत

पीटीआय
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

हैदराबाद - बॅडमिंटनमध्ये आता खुले आव्हान निर्माण झाले आहे. अनेक देशांतील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे एक काळ असलेली लीन डॅन आणि ली चोंग वेई यांची मक्तेदारी आता संपुष्टात आल्याची प्रतिक्रिया भारताचा बॅडमिंटन सुपरस्टार किदांबी श्रीकांत याने व्यक्त केली.

हैदराबाद - बॅडमिंटनमध्ये आता खुले आव्हान निर्माण झाले आहे. अनेक देशांतील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे एक काळ असलेली लीन डॅन आणि ली चोंग वेई यांची मक्तेदारी आता संपुष्टात आल्याची प्रतिक्रिया भारताचा बॅडमिंटन सुपरस्टार किदांबी श्रीकांत याने व्यक्त केली.

 कारकिर्दीत सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या भारताच्या किदांबी श्रीकांतने या वर्षी पाच महिन्यात चार सुपर सीरिज स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. अलीकडच्या काळात एखादा नाही, तर अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळविण्याची क्षमता बाळगून आहेत, असे सांगून श्रीकांत म्हणाला, ‘‘गेली अनेक वर्षे लीन डॅन आणि ली चोंग वेई यांची मक्तेदारी होती; पण आता तसे नाही. माझ्यासह व्हिक्‍टर ॲक्‍सेल्सन आणि अनेक खेळाडू विजेतेपद मिळविण्याची क्षमता बाळगून आहेत. बॅडमिंटन खेळ आता अधिक खुला झाला आहे. एकापेक्षा अधिक खेळाडू विजेतेपदाच्या शर्यतीत असणे हे खेळाच्या प्रगतीचे उत्तम उदाहरण मानले जाते.’’

डेन्मार्क आणि फ्रेंच विजेतेपद पटकाविल्यानंतर श्रीकांत मायदेशी परतला तेव्हा त्याचा मंगळवारी पी. गोपीचंद अकादमीत सन्मान करण्यात आला. त्या वेळी तो बोलत होता. तो म्हणाला, ‘‘एकाच वेळी अनेक खेळाडू आता सर्वोत्तम खेळ करत आहेत. एखादी स्पर्धा अमूकच एखादा खेळाडू जिंकेल, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवणे अनिवार्य झाले आहे.’’

लीन डॅन आणि चोंग वेई यांची कारकीर्दच संपुष्टात आली असे म्हणता येईल का, असे विचारले असता त्याने नकार दिला. तो म्हणाला, ‘‘अगदीच तसे म्हणता येणार नाही. दोघेही महान खेळाडू आहेत. त्यांचा अनुभव इतका आहे की ते केव्हाही मुसंडी मारू शकतात. सध्या ते अपयशी ठरत आहेत म्हणून त्यांना कमी लेखणे चुकीचे आहे. अर्थात, आपण सर्वोत्तम कामगिरी करु शकतो याचा विश्‍वास बाळगणेदेखील महत्वाचे आहे.’’