बोल्ट, फराहच्या निवृत्तीचे भव्य व्यासपीठ

पीटीआय
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

लंडन - जमैकाचा उसेन बोल्ट, यजमान ग्रेट ब्रिटनचा मो फराह या दोन महान ॲथलिट्‌सची होणारी कामगिरी आणि त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीचा शेवट शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या १६ व्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरेल. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत भव्य स्पर्धा असे वर्णन याविषयी करण्यात आले आहे. 

लंडन - जमैकाचा उसेन बोल्ट, यजमान ग्रेट ब्रिटनचा मो फराह या दोन महान ॲथलिट्‌सची होणारी कामगिरी आणि त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीचा शेवट शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या १६ व्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरेल. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत भव्य स्पर्धा असे वर्णन याविषयी करण्यात आले आहे. 

रिलेविषयी सांगू शकत नाही; मात्र शंभर मीटर शर्यतीनंतर ‘अनबिटेबल, अनस्टॉपेबल’ असे हेडिंग राहील, अशी घोषणाच बोल्टने केली. तो म्हणाला, ‘‘यंदाच्या मोसमात मी फक्त तीन शर्यती धावलो असलो, तरी तुम्ही माझ्या क्षमतेविषयी शंका घेऊ नका. यापूर्वीही असे घडले आहे आणि प्रत्येकी वेळी मीच सुवर्णपदकाचा मानकरी ठरलो आहे.’’ शंभर मीटर शर्यतीत पराभूत झाल्यास दोनशे मीटर शर्यतीत सहभागी होणार का, या प्रश्‍नावर बोल्टने नम्रपणे नाही असे उत्तर दिले. त्यामुळे दोनशेमध्ये बोल्ट विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा वायदे व्हॅन निकर्क ही संभाव्य लढत पाहायला मिळणार नाही. 

बोल्टच्या शर्यतीचे हेडिंग ठरण्यापूर्वीच मो फराहचे हेडिंग निश्‍चित झालेले असेल. कारण, पहिल्याच दिवशी दहा हजार मीटरची अंतिम शर्यत होत आहे. तो जिंकला, तर त्याचे हे जागतिक पातळीवरील सलग दहावे सुवर्णपदक राहील. स्पर्धा या दोन नावांभोवती केंद्रित असली, तरी चारशे मीटरचा विश्‍वविक्रमवीर वायदे व्हॅन निकर्क या नावाविषयी चर्चा करणे गरजेचे आहे. विश्‍व व ऑलिंपिक विजेतेपद मिळविल्याने तसा तो नावारूपास आला आहे. मात्र, येथे तो दोनशे व चारशे मीटर शर्यतीत सहभागी होणार आहे. दोन्ही शर्यतींत तो विजयी ठरला तर ही दुर्मिळ कामगिरी मानली जाईल. कारण आधुनिक ॲथलेटिक्‍समध्ये या दोन शर्यतींची निवड एकत्रितपणे ॲथलिट्‌स करीत नाहीत. असे यश फक्त मायकेल जॉन्सन यांनी मिळविले आहे. त्यामुळेच निकर्ककडे नवीन हिरो म्हणून पाहिले जात आहे. 

भारतीयांची कसोटी
भारताचे २५ स्पर्धक सहभागी
सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आव्हान
भालाफेक खेळाडू नीरज चोप्रावरच मदार
महंमद अनस, निर्मला (४०० मीटर), अनू राणी (भालाफेक), के. टी. इरफान (चालणे) यांच्याकडून अपेक्षा
लांबपल्ल्याचा धावपटू जी. लक्ष्मणन केवळ पाच हजार मीटरमध्येच धावणार
त्याची निवड दहा हजार मीटरसाठीदेखील. मात्र, दमछाक टाळण्यासाठी संघ व्यवस्थापनाचा निर्णय

स्पर्धा विशेष
महिलांच्या ५० कि.मी. धावण्याच्या शर्यतीचा प्रथमच समावेश
इलीन थॉम्प्सन, डाफने शिफर्स (स्प्रिंट), कॅस्टर सेमेन्या (८०० मीटर) यांच्या कामगिरीकडे लक्ष
गेन्झेबे, तिरुनेश दिबाबा (इथियोपिया) बहिणींचे आकर्षण
पुरुष, महिला मॅरेथॉन प्रथमच एकाच दिवशी
केनिया, अमेरिका, जमैका देशांत अव्वल स्थानासाठी चुरस
उत्तेजक सेवन रोखण्यासाठी घेणार सहाशे चाचण्या
जागतिक स्पर्धेत आतापर्यंत १५५ धावपटू दोषी
कॅनडाचा स्प्रिंट धावपटू आंद्रे दी ग्रासीची मांडीच्या दुखापतीमुळे माघार