भारतीय फुटबॉल संघाच्या विजयाचे अष्टक

पीटीआय
बुधवार, 14 जून 2017

बंगळूर - गुरप्रीत सिंगचे पूर्वार्धातील भक्कम गोलरक्षण आणि उत्तरार्धात भारताचा स्टार आक्रमक सुनील छेत्रीने साधलेली संधी यामुळे भारताने आशिया कप पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या अ गट साखळीत किर्गिझस्तानचा पाडाव केला. या विजयामुळे भारताने गटात अग्रस्थान मिळवले. भारताचा हा सलग आठवा विजय ठरला.

कांतिरवा स्टेडियमवर लढत सुरू होण्यापूर्वीच सुरू झालेला इंडिया... इंडिया... गजर थांबवण्यासाठी किर्गिझस्तानने आक्रमक सुरवात केली. सुरवातीच्या वीस मिनिटांत; तर भारतीयांना प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात प्रवेश करणेही अशक्‍य झाले होते. या कालावधीत गुरप्रीत सिंगने भक्कम गोलरक्षण करताना किर्गिझस्तानला गोलपासून रोखले. व्हाईट फाल्कन्स सुरवातीची जोरदार भरारी भारताच्या भक्कम बचावफळीने रोखली. प्रतिआक्रमणास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतलेल्या ब्ल्यू टायगर्सची आक्रमणे सुरू झाल्यावर किर्गीज बचावफळीवर दडपण आले. अखेर सुनील छेत्रीने ६९ व्या मिनिटास गोल करीत भारताचा सलग आठवा विजय साकारला. त्यानेच म्यानमारविरुद्धच्या सलामीच्या लढतीतील निर्णायक गोल केला होता. 

पूर्वार्धात काहीसा विस्कळित असलेल्या भारतीय आक्रमणात उत्तरार्धात जास्त भेदकता आली. भरवशाचा जेजे लालपेखलुआ आणि सुनील छेत्री यांच्यातील सामंजस्य वाढले. त्यातूनच अप्रतिम गोल झाला. छेत्रीने किर्गिझस्तानमधल्या फळीस अक्षरशः एकहाती चकवले आणि जेजेकडे पास दिला. जेजेने किर्गीझ बचावफळीस गुंगारा देत छेत्रीकडे हुशारीने चेंडू सोपवला आणि भारतीय कर्णधाराने चूक केली नाही.