भारतीय महिलांची विजयी सलामी

मुकुंद धस
सोमवार, 24 जुलै 2017

अनिताच्या अचूक कामगिरीने उझबेकिस्तानवर मात

बंगळूर - कर्णधार अनिता पॉल दुराईच्या अचूक नेमबाजीच्या जोरावर जागतिक क्रमवारीत ४० व्या स्थानावर असलेल्या यजमान भारताने ५४ व्या स्थानावर असलेल्या उझबेकिस्तानचा ९२-७६ असा पराभव करून बंगळूर येथील कांतीरवा बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू असलेल्या फिबा आशिया कप महिला बास्केटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. 

अनुभवी अनिताने मध्यंतरापर्यंत चार तीन गुणांच्या बास्केटसह १८ गुण नोंदवून मध्यंतरास संघास ४३-३० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. नव्याने नेमणूक करण्यात आलेल्या भारताच्या प्रशिक्षकांनी अनुभवी अनिताचा मोठ्या खुबीने वापर करून घेतला आणि अनिताला वारंवार विश्रांती देण्याची त्यांची चालही कमालीची यशस्वी ठरली. त्याचप्रमाणे सर्वच खेळाडूंना थोडी थोडी विश्रांती देऊन पुन्हा मैदानात पाठवण्याची त्यांची चाल यजमानांना नवीनच होती; परंतु ती लाभदायकही ठरली. प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा लाभलेल्या यजमानांनी उत्तरार्धात स्पर्धेतील सर्वांत उंच म्हणजे ६ फूट ११ इंच उंचीच्या पूनम चतुर्वेदीला मैदानात उतरवले आणि तिने लागलीच बास्केट करून आपल्यावरील विश्‍वास सार्थ ठरवला. या बास्केटमुळे आत्मविश्‍वास उंचावलेल्या पूनमने आणखी २ बास्केट करून संघाची आघाडी तिसऱ्या सत्राअंती ६९-५३ अशी वाढवण्यास मदत केली. यामध्ये अनिताच्या ८ गुणांचाही वाटा होता. तगड्या शरीरयष्टीच्या उझबेकिस्तानच्या खेळाडूंनी अनिताला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही आणि सामन्याचा निकाल स्पष्ट झाला. अंतिम सत्रात चिकाटीने खेळणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांनी खेळाची गती वाढवून भराभर गुण नोंदवण्याचा प्रयत्न केला; मात्र यजमानांनी आघाडी कायम राखत विजय साजरा केला. अनिताचा खेळच भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरला. तिने सात प्रयत्नात तीन गुणांचे सहा बास्केट नोंदवून आपली छाप पाडली. भारताची बचाव फळी मात्र म्हणावी तशी कामगिरी करू शकली नाही.  

अन्य निकाल
जपान वि.वि. फिलिपाइन्स १०६-५५, ऑस्ट्रेलिया वि.वि. कोरिया ७८-५४, तैवान वि.वि. उत्तर कोरिया ७७-७६, चीन वि.वि. न्यूझीलंड ७७-४८, सिंगापूर वि.वि. फिजी १०३-३८