समांतर कबड्डी संघटनेची राष्ट्रीय स्पर्धा आजपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई - भारतातील समांतर कबड्डी संघटना आपली पहिली ‘चढाई’ आजपासून  (ता. ६) सुरू करणार आहे. दी न्यू कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाने घेतलेल्या या स्पर्धेत ३१ राज्यांच्या संघांचा सहभाग आहे. या स्पर्धेची क्षणचित्रे दाखवण्यास ‘डीडी स्पोर्टस्‌’ला तयार करून संयोजकांनी आपली तयारी दाखवली आहे. 

त्रिची (तमिळनाडू) येथील आरव्हीएस आर्टस्‌ ॲण्ड सायन्स कॉलेज, इनामकुलतुर येथे मॅटवर ही स्पर्धा होईल. त्यासाठी पुरुषांची चार; तर महिलांची तीन मैदाने तयार होत आहेत. त्याचबरोबर १६ हजार क्षमतेची खास गॅलरी उभारण्यात आली आहे, असे या संघटनेचे सचिव एम. व्ही. प्रसाद बाबू यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी १२ संघ यापूर्वीच दाखल झाले आहेत. आज रात्री, तसेच उद्या (ता. ६) सकाळपर्यंत सर्व संघ दाखल होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या स्पर्धेत भारतीय कबड्डीच्या अध्यक्ष असलेल्या डॉ. मृदुला भादुरिया यांच्या राजस्थानचा, तसेच सचिव दिनेश पटेल यांच्या गुजरातचा असे दोन्ही संघ सहभागी होत आहे. ईशान्य राज्यातील कबड्डी संघांचा या स्पर्धेतील सहभाग हे प्रमुख आकर्षण मानले जात आहे. मात्र, त्यांनी त्याच वेळी भारतीय कबड्डीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील केवळ पुरुषांचाच संघ येत असल्याचे सांगितले. 

संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार- या स्पर्धेतील पुरुष विभागात ३०, तर महिलांच्या विभागात २५ संघांत चुरस आहे. महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, तसेच सिक्कीमचे केवळ पुरुष संघच येत आहेत; तर मणिपूरने केवळ महिलांचाच संघ पाठवला आहे. सहभागी  संघांची उद्या दुपारी बैठक झाल्यावर स्पर्धेची गटवारी, तसेच कार्यक्रम निश्‍चित होईल. चार दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेची सांगता ९ जुलैला होणार आहे.