राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राची जेतेपदाची हॅटट्रिक

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राची जेतेपदाची हॅटट्रिक

मुलींत कर्नाटकला विजेतेपद; नाशिकचा चंदू चावरे, बी. चित्रा ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू, शरद पवारांचा हृद्य सत्कार

नाशिकः धावण्यातील चपळता आणि संरक्षणातील सांघिकपणाच्या जोरावर मुलांच्या गटात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर 11 विरुद्ध 4 अशा 7 गुणांनी विजय मिळवत जेतेपदाची हॅटट्रिक नोंदवली. मुलींच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत विजेत्या कर्नाटककडून महाराष्ट्राला 6-5 अशा केवळ 1 गुणाने पराभवाला सामोरे जावे लागले.

नाशिकच्या चंदू चावरे व कर्नाटकची बी. चित्रा यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावला. माजी केंद्रीय कृषी-संरक्षणमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. कबड्डी, कुस्ती व खो-खो या मराठमोळ्या खेळांसह इतर खेळांच्या वाढीसाठी बहुमोल योगदान देणारे; तसेच मदतीसाठी नेहमीच तत्पर असलेल्या श्री. पवार यांचा जिल्ह्यातील क्रीडा संघटनांतर्फे स्मृतिचिन्ह देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.

दुपारी मुला-मुलींचे अंतिम सामने झाले. मुलांच्या आंध्र प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र या अंतिम सामन्यात शुभम थोरात, चंदू चावरे, धीरज भावे, साहिल चिखले या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. मध्यंतराला 6-2 अशी चार गुणांची आघाडी महाराष्ट्राकडे होती. शुभम थोरातने आंध्रच्या खेळांडूना अक्षरक्षः नाकीनऊ आणले. पहिल्या सत्रात तो 3 मि.30 सेकंद; तर दुसऱ्या सत्रात 5. मि 05 सेकंद इतका धावला. चंदू चावरे 1.30 मि. आणि 1.15 मिनिटे इतके धावण्याबरोबरच दोन गडी बाद करण्यात हातभार लावला. दुसऱ्या बाजूला धीरज भावे 2.20मि व 40 सेकंद धावला; तर नागेश चोरलीकर, रामजी कश्‍यप यांनी प्रत्येकी दोन; तर साहिल चिखलेने तीन गडी बाद करत विजयाला महत्त्वपूर्ण वाटा उचलला. मध्यंतरानंतर आंध्र प्रदेशला धावणे व संरक्षणात जमू न दिल्याने त्यांना केवळ दोनच गुण वसूल करता आले. दुसऱ्या सत्रात शुभम थोरातचा खेळ वाखण्याजोगा झाला. याच जोरावर महाराष्ट्राने 11-4 असा 7 गुणांनी विजय मिळवत हॅटट्रिक साधली.

चुरशीच्या लढतीत कर्नाटकची महाराष्ट्रावर मात
मुलांमध्ये हॅटट्रिक नोंदविणाऱ्या महाराष्ट्राला मुलींच्या गटात चुरशीच्या अंतिम लढतीत बलाढ्य कर्नाटककडून 6-5 अशा एका गुणाने पराभव चाखावा लागला. चपळाईने धावणे, आक्रमकपणे गडी बाद करणे आणि संरक्षणातील सांघिकपणा कर्नाटक संघात पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या साक्षी सर्जने पहिल्या सत्रात 1मि आणि दुसऱ्या सत्रात 30 सेकंद धावली. साक्षी वाफळकर (1.30मि व 2,20 मि), मयूरी पवार(2 मि.आणि 2.40 मि) यांनीही चांगला खेळ करत उपस्थितांची वाहवा मिळवली. ऋतिका राणे हिने सुरवातीला दोन; तर मध्यंतरानंतर एक गडी बाद केला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पूर्वार्धात केलेल्या चुका त्यांना भोवल्या. त्यामुळे दुसऱ्या सत्रात कर्नाटकविरुद्ध आघाडी मिळवणे अवघड होऊन बसले. कर्नाटकाच्या मुलींनी सांघिक खेळाच्या जोरावर सामन्यावर पूर्णपणे आपले वर्चस्व राखत जेतेपद पटकावले.

माजी केंद्रीय कृषी- संरक्षणमंत्री शरद पवार मार्गदर्शन करताना म्हणाले, ""खो-खो हा मराठमोळा खेळ आहे. सुरवातीच्या काळात महाराष्ट्र, गुजरात, इंदूरमध्ये तो खेळला जात. त्या वेळी इंदूर, बडोद्याच्या जोडीला महाराष्ट्राचे नाव घेतले जाईल. खो-खोचा सर्वत्र प्रसार झाल्याने इतर राज्येही सहभागी होऊ लागली आहे ही चांगली बाब आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतही सहभाग झाल्यानंतर या खेळात सुवर्णपदक नक्कीच जिंकतील, असे खेळाडू आपल्याकडे आहे. विशेषतः कुमार-कुमारी गटाकडे प्रशिक्षक, मार्गदर्शकांनी अधिक लक्ष द्यावे.'' या वेळी अखिल भारतीय खो-खो संघाचे सुरेश शर्मा, गोविंद शर्मा, वनाधिपती विनायक पाटील, आमदार जयंत जाधव आदी उपस्थित होते.

मुले
विजेते-
महाराष्ट्र, उपविजेते- आंध्र प्रदेश, तृतीय- तेलंगणा,चतुर्थ- कोल्हापूर

मुली
विजेते-
कर्नाटक, उपविजेते- महाराष्ट्र, तृतीय- झारखंड,चतुर्थ- तमिळनाडू
सर्वोत्कृष्ट खेळाडू- चंदू चावरे (नाशिक-महाराष्ट्र),बी. चित्रा (कर्नाटक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com