प्रतिकाराचीही संधी न दिल्याचे समाधान - श्रीकांत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

मुंबई - अंतिम सामना सुरू असताना तो कसा जिंकता येईल, हा विचार न करताना चुका कशा टाळता येतील आणि लाँगला प्रतिकारापासून कसे रोखता येईल याकडेच माझे लक्ष केंद्रित होते, असे सांगून किदांबी श्रीकांतने आक्रमणाची कोणतीही संधी न सोडल्याचा अंतिम लढतीत फायदा झाल्याचे स्पष्ट केले.

मुंबई - अंतिम सामना सुरू असताना तो कसा जिंकता येईल, हा विचार न करताना चुका कशा टाळता येतील आणि लाँगला प्रतिकारापासून कसे रोखता येईल याकडेच माझे लक्ष केंद्रित होते, असे सांगून किदांबी श्रीकांतने आक्रमणाची कोणतीही संधी न सोडल्याचा अंतिम लढतीत फायदा झाल्याचे स्पष्ट केले.

अंतिम लढतीत सर्व काही अपेक्षेनुसार घडले. या स्पर्धेत सातत्याने चांगला खेळ करीत असलेल्या चेनला हरवून विजेतेपद जिंकल्याचा आनंद आहे, असे श्रीकांतने सांगितले. त्याच वेळी त्याने अंतिम फेरीचे कोणतेही दडपण नसल्याचे आवर्जून नमूद केले. तो म्हणाला, की जास्तीत जास्त वेळ शटल कोर्टमध्ये ठेवण्याचे माझे लक्ष होते. गुण मिळवण्याची एकही संधी सोडायची नाही, हे महत्त्वाचे होते. त्याचबरोबर प्रत्येक ब्रेकच्या वेळी विजयाचा विचार न करता चुका कशा होणार नाहीत, याचाच विचार करीत होतो. माझ्याकडून चुका झाल्या, तर त्याला प्रतिकाराची संधी मिळेल, हेच टाळणे आवश्‍यक होते. आक्रमक खेळ यशस्वी ठरला याचे समाधान  आहे. याचे कारण सांगता येणार नाही; पण त्यात यश आल्याचा आनंद आहे. 

माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळ होत आहे. त्याचबरोबर भारतीय बॅडमिंटनही यशस्वी होत आहे. मीच नव्हे तर प्रणीत, प्रणॉयला यश मिळत आहे. खेळात अधिक सातत्य आले, तर मला आवडेल, असे त्याने सांगितले. आपण हे विजेतेपद गोपीचंद अकादमीतील सर्वांनाच विशेषतः प्रकाशात नसलेल्या स्टाफला अर्पण करीत असल्याचे सांगितले.
 

चेन लाँगसारख्या खेळाडूस हरवून श्रीकांतने आपण कोणालाही पराजित करू शकतो, हेच दाखवून दिले आहे. त्याचा नेटजवळचा खेळ, तसेच बेसलाइनवरून केलेले आक्रमण जबरदस्त होते. या यशाने त्याच्या खेळात सातत्य येत आहे हे दिसले. सामन्यातील परिस्थितीनुसार त्याने खेळात बदल केला. अंतिम लढतीपूर्वी त्याला फक्त फोनपासून जास्तीत जास्त दूर राहा, असाच सल्ला दिला होता. 
- पुल्लेला गोपीचंद

टॅग्स