उत्तेजक चाचणीत मनप्रीत कौर दोषी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

नागपूर - ॲथलेटिक्‍सच्या गोळाफेक क्रीडा प्रकारातील भारताची आशियाई विजेती मनप्रीत कौर उत्तेजक सेवनात अडकली आहे. मात्र तिच्या नमुन्यात सापडलेले डिमिथीलबुटीलामाईन (dimethylbutylamine) हे उत्तेजक जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेच्या (वाडा) प्रतिबंधित उत्तेजकाच्या यादीत येत नसल्याने सध्या तरी तिच्यावर कुठल्याही प्रकारची बंदी टाकण्यात आलेली नाही. ‘ब’ नमुन्यातही ती दोषी आढळली तर मात्र तिने भुवनेश्‍वर येथे आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक गमवावे लागेल. 

मनप्रीतच्या नमुन्यात सापडलेले उत्तेजक हे बंदी नसलेले असल्यामुळे लंडन येथे येत्या ४ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेसाठी मनप्रीत कौर पात्र ठरू शकते. पण, तिचा जागतिक स्पर्धेतील सहभाग हा सर्वस्वी भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाच्या निवड समितीवर अवलंबून असेल.  तिची निवड करून जागतीक स्पर्धेत आपली मानहानी करून घेण्यापेक्षा तिची निवड न केलेली बरी, असे एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणाला. तसेही तिच्या कामगिरीत सातत्य कधीच नव्हते, असा टोमणाही या अधिकाऱ्याने मारला. मनप्रीत दोषी सापडल्याचे ‘नाडा’ने भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाला कळविले असून महासंघाच्या पदाधिकाऱ्याने त्यास होकार दिला आहे. मनप्रीतचा पती आणि प्रशिक्षक करमजीत कौरने मात्र, आपल्याला असे काहीही कळविले नसल्याचे सांगितले. 

डिमिथीलबुटीलामाईनचा वापर केल्यानंतर एखादा ॲथलिट्‌ पकडला जाण्याची ही पहिलीच वेळ होय. हे उत्तेजक प्रतिबंधिति यादीत नसले तरी मिथीलहेएक्‍सामाईन (mthylhexanamine)  या उत्तेजकाशी संबंधित आहे. मिथीलहेएक्‍सामिनचा वापर २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी अनेक क्रीडापटूंनी केला होता. मनप्रीतने यंदा चीनमध्ये झालेल्या आशियाई ग्रॅंडप्रिक्‍स स्पर्धेत १८.८६ मीटरवर गोळा फेकून जागतीक स्पर्धेची पात्रता गाठली होती. मात्र, तिच्या कामगिरीत अजिबात सातत्य नाही.