वादग्रस्त संघ निवडीनंतर नीरजवरच केवळ आशा

पीटीआय
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

लंडन येथील क्वीन एलिझाबेथ ऑलिंपिक पार्क स्टेडियमवर चार ऑगस्टपासून १६ व्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेला सुरवात होत आहे. त्या निमित्ताने स्पर्धेचा मागोवा घेणाऱ्या मालिकेस भारताच्या आव्हानापासून सुरवात करत आहोत.

लंडन येथील क्वीन एलिझाबेथ ऑलिंपिक पार्क स्टेडियमवर चार ऑगस्टपासून १६ व्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेला सुरवात होत आहे. त्या निमित्ताने स्पर्धेचा मागोवा घेणाऱ्या मालिकेस भारताच्या आव्हानापासून सुरवात करत आहोत.
भारतीय संघ जागतिक स्पर्धेत कशी कामगिरी करेल हे सांगता येत नाही. संघ निवडीच्या वादापासून त्यांच्या कामगिरीवर परिणाम व्हायला सुरवात झाली आहे. चित्रा, उदय आणि सुधा सिंग या आशियाई पदक विजेत्यांना संघातून वगळल्यापासून या वादाला सुरवात झाली. चित्राने न्यायालयाकडून संघात स्थान मिळविले. मात्र, उशीर झाल्याने आंतरराष्ट्रीय महासंघाने तिची प्रवेशिका नाकारली. त्या उलट सुधा सिंगचे झाले. सुधाला संघातून वगळल्यानंतरही आंतरराष्ट्रीय महासंघाच्या स्पर्धा कार्यक्रम पत्रिकेत तिचे नाव झळकले. सुधा जाण्यास तयार असली, तरी भारतीय महासंघ तिला सोडण्यास तयार नाही, त्यामुळे ती धावणार की नाही हे अजून अनिश्‍चित आहे. अशा वेळी लंडनमध्ये गेलेल्या २५ सदस्यीय संघातील केवळ भालाफेक प्रकारात नीरज चोप्राकडूनच आशा आहेत. जागतिक स्पर्धेत भारताचे दुसरे पदक त्याने मिळवून द्यावे, अशीच इच्छा आहे.

नीरजच का
गतवर्षी ज्युनिअर विश्‍व स्पर्धेत विश्‍वविक्रमासह आणि नुकत्याच झालेल्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने तो पदक जिंकूनच येईल, अशी सर्वसाधारण भावना आहे. मात्र, नीरजसाठी पदक जिंकणे तितके सोपे नाही. सध्याची त्याची कामगिरी विचारात घेता तो अंतिम फेरी गाठेल यात वाद नाही. मात्र, अंतिम फेरीत त्याच्यापुढे अनेक दिग्गजांचे आव्हान असेल. सहभागी स्पर्धकांच्या यंदाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास नीरजपेक्षा अकरा ॲथलिट्‌स पुढे आहेत. त्यामुळे पदकपर्यंत पोचण्यासाठी किंवा कमीत-कमी पहिल्या सहांत येण्यासाठी नीरजला ८८ मीटरपर्यंत भाला फेकावा लागेल. नीरजसोबत देवेंदर सिंग कांग हा दुसरा भारतीय स्पर्धकही सहभागी होत आहे. त्याने अंतिम फेरीत स्थान मिळविले तरीही सर्वोत्तम कामगिरी केली असे म्हणावे लागेल.