अमेरिकेची ‘सुवर्ण’धाव कायम

पीटीआय
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

लंडन - यंदाच्या जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या धावपटूंनी सनसनाटी निकाल नोंदविण्याचा जणू विडाच उचलला आहे. आधी ‘स्प्रिंट’ प्रकारात त्यांच्या धावपटूंनी केवळ ॲथलेटिक्‍स विश्‍वालाच धक्का दिला नाही, तर अवघ्या क्रीडाप्रेमी चाहत्यांना आपल्या कामगिरीने चक्रावून सोडले. आता महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत त्यांच्या फायलीस फ्रान्सिसने धक्कादायक कामगिरीची नोंद केली. पुरुषांच्या चारशे मीटर हर्डल्स शर्यतीतही नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहोमने दिग्गजांना चकीत केले, तर महिला गोळाफेकीत गाँग लिजिओने प्रथमच जागतिक पातळीवर सुवर्णपदक जिंकले.  

लंडन - यंदाच्या जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या धावपटूंनी सनसनाटी निकाल नोंदविण्याचा जणू विडाच उचलला आहे. आधी ‘स्प्रिंट’ प्रकारात त्यांच्या धावपटूंनी केवळ ॲथलेटिक्‍स विश्‍वालाच धक्का दिला नाही, तर अवघ्या क्रीडाप्रेमी चाहत्यांना आपल्या कामगिरीने चक्रावून सोडले. आता महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत त्यांच्या फायलीस फ्रान्सिसने धक्कादायक कामगिरीची नोंद केली. पुरुषांच्या चारशे मीटर हर्डल्स शर्यतीतही नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहोमने दिग्गजांना चकीत केले, तर महिला गोळाफेकीत गाँग लिजिओने प्रथमच जागतिक पातळीवर सुवर्णपदक जिंकले.  

गेल्यावर्षी रिओ ऑलिंपिकमध्ये महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत अंतिम रेषेवर उडी मारून बहामाच्या शॉने मिलरने सुवर्णपदक जिंकले होते. या वेळी जागतिक ॲथलेटिक्‍समध्ये तिला फारसे काही करण्याची संधी मिळाली नाही. फायलीस हिने अगदी सहज ही शर्यत जिंकली. पावसामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर चांगलाच परिणाम झाला. शॉने मिलर युबोला हिलादेखील त्याचा फटका बसला. चारशे मीटरची शर्यत सुरू झाल्यावर शॉनने नेहमीप्रमाणे वेगवान प्रारंभ केला. शेवटचे तीस मीटर अंतर शिल्लक असताना पावसामुळे तिचे स्नायू जखडले. त्यामुळे उजवा पाय ट्रॅकला घासला. त्यातच तिची लय गेली आणि याचा फायदा घेत अमेरिकेच्या फायलीस व बहरिनच्या विश्‍व ज्युनिअर युवा विजेत्या १९ वर्षीय सल्वा नासेरने वेग वाढवून अनुक्रमे सुवर्ण (४९.९२ सेकंद), व रौप्य (५०.०६ सें) पदक जिंकले. अमेरिकेची ॲलीसन फेलीक्‍स ब्राँझपदकाची मानकरी ठरली. 

पुरुषांच्या चारशे मीटरमध्ये नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहोमने दिग्गजांना चकीत करताना ४८.३५ सेकंदात सुवर्ण जिंकले. तुर्कीचा यास्मानी कोपेलो रौप्य (४८.४९ सेकंद) तर दोन वेळचा विश्‍वविजेता व ऑलिंपिक विजेता अमेरिकेचा केरॉन क्‍लेमेंट ब्राँझपदकाचा (४८.५२ से) मानकरी ठरला. महिला गोळाफेकीत चीनच्या गाँग लिजिओने अखेर जागतिक पातळीवर सुवर्णपदक (१९.९४ मीटर) जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले. हंगेरीची अनिता मार्तोनने रौप्य (१९.४९ मीटर) तर रिओतील विजेती अमेरिकेची मिचेल कार्टरने ब्राँझपदक (१९.१४ मी.) जिंकले. 

मो फराहची आगेकूच
दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर दुसरे सुवर्णपदक जिंकण्याच्या मार्गावर असलेल्या ग्रेट ब्रिटनच्या मो फराहने शनिवारी होणाऱ्या पाच हजार मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाऊस सुरू असल्याने फराहने कुठलाही धोका पत्करला नाही आणि आघाडीच्या जथ्यात राहणे पसंत केले आणि १३ मिनिटे ३०.१८ सेकंदात शर्यत पूर्ण केली. तो पाच हजार मीटर शर्यतीत विजयी झाला तर त्याचे हे जागतिक स्पर्धा व ऑलिंपिकमधील (पाच व दहा हजार मीटर मिळून) सलग अकरावे सुवर्णपदक तसेच जागतिक स्पर्धेत पाच हजार मीटरमधील सलग चौथे सुवर्णपदक तो मिळवेल. ही त्याची जागतिक स्पर्धेतील शेवटची शर्यत राहील. 

लक्ष्मणनची सर्वोत्तम वेळ 
पाच हजार मीटर शर्यतीत भारताचा आशियाई विजेता जी. लक्ष्मणनने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. तरीही तो अंतिम फेरीत स्थान मिळवू शकला नाही. सेनादलात कार्यरत असलेल्या लक्ष्मणनने १३ मिनिटे ३५.६९ सेकंदात शर्यत पूर्ण केली. तरीही त्याला पंधरावे स्थान मिळाले. बहादूर प्रसादच्या राष्ट्रीय विक्रमानंतर भारतीय धावपटूने नोंदविलेली ही दुसरी सर्वोत्तम वेळ होय. 

नाट्यानंतर मकवाला अंतिम फेरीत
रोगाची लागण होऊ नये म्हणून बोटसवानाच्या इसाक मकवालाला चारशे मीटर शर्यतीच्या वेळी स्टेडियममध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र, तो तंदुरुस्त झाला, हे वैद्यकीय समितीने स्पष्ट केल्यावर मकवालाला नैसर्गिक न्याय म्हणून दोनशे मीटरमध्ये धावण्याची संधी देण्यात आली. दोनशे मीटरच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्याची एकट्याची चाचणी घेण्यात आली. त्यासाठी त्याला २०.५३ सेकंदाच्या आत शर्यत पूर्ण करणे गरजेचे होते. त्याने २०.२० सेकंदात शर्यत पूर्ण केली. त्यानंतर उपांत्य फेरीत दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली. चारशेचा विजेता दक्षिण आफ्रिकेचा वायदे व्हॅन निकर्कही अंतिम फेरीत पोचला आहे. जमैकाचा योहान ब्लेक मात्र उपांत्य फेरीतच गारद झाला. अंतिम फेरीत जमैकाचा एकही धावपटू नाही.

महत्त्वाचे 
चारशे हर्डल्समध्ये १९९९ नंतर प्रथमच युरोपियन धावपटूला सुवर्ण. त्या वेळी इटलीचा फॅब्रीझिओ मोरी विजेता होता.
गोळाफेकीत गाँग लिजिओचे जागतिक स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण असले, तरी एकूण चौथे पदक होय. 
चारशे मीटरमध्ये सुवर्णपदक कायम राखण्याचे ॲलीसन फेलीक्‍सचे स्वप्न भंगले. तिचे हे जागतिक स्पर्धेतील (दोनशे व चारशे मिळून) सातवे पदक होय. त्यात चार सुवर्णपदकाचा समावेश आहे. 
जन्माने नायजेरियन असलेली सल्वा नासेर ही चारशे मीटरमध्ये पदक जिंकणारी सर्वात युवा धावपटू होय.
सहाव्या दिवसाअखेर पदकतालिकेत अमेरिकेने चार सुवर्णसह एकूण १५ पदके जिंकली आहे. आता २३ इव्हेंटचा फैसला झाला असून केवळ २९ देशानांच पदक जिंकता आले आहे. 
महिला गोळाफेकीत तब्बल २४ वर्षांनंतर चीनला सुवर्ण. त्यावेळी हुआंग झिआंगने सुवर्ण जिंकले होते.