महाराष्ट्राच्या संजीवनीला रौप्यपदक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - महाराष्ट्राची सुवर्णकन्या संजीवनी जाधव हिला आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा अश्‍गबात (तुर्कमेनिस्तान) येथे सुरू आहे. पूर्णिमा हेम्ब्रमने महिलांच्या पेन्टॅथलॉनमध्ये बाजी मारीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. 

नागपूर - महाराष्ट्राची सुवर्णकन्या संजीवनी जाधव हिला आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा अश्‍गबात (तुर्कमेनिस्तान) येथे सुरू आहे. पूर्णिमा हेम्ब्रमने महिलांच्या पेन्टॅथलॉनमध्ये बाजी मारीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. 

नाशिककर संजीवनीने सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्यानेच शर्यत सुरू केली. पहिल्या किलोमीटरमध्ये ती पाच हजार मीटरची माजी आशियाई विजेती संयुक्त अरब अमिरातची आलिया महंमद हिच्या मागे होती. दुसरा किलोमीटर ६ मिनिटे २७.७१ सेकंदात संपली त्या वेळी संजीवनी आघाडीवर होती. शेवटच्या टप्यात दोघींनी वेग वाढविला. त्यात आलियाने बाजी मारली.

तिने ९ मिनिटे २५.०३ सेकंदात सुवर्णपदक जिंकले. संजीवनीला ९ मिनिटे २६.३४ सेकंद वेळ लागली. गेल्या तीन महिन्यात हे तिचे तिसरे आंतरराष्ट्रीय पदक होय. भुवनेश्‍वर येथे आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत तिने पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले होते, तर गेल्या महिन्यात तायपई सिटी येथे विश्‍व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत तिने दहा हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. आजच्या कामगिरीमुळे तिला सुवर्णपदकासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. 

पेन्टॅथलॉनमध्ये आशियाई ब्राँझपदक विजेत्या पूर्णिमा हेम्ब्रमने ४०६२ गुण मिळवीत सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या तीन हजार मीटर शर्यतीत आशियाई स्पर्धेतील दुहेरी सुवर्णपदक विजेत्या जी. लक्ष्मणनने अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक फेरीत प्रथम स्थान मिळविताना त्याने ८ मिनिटे ५०.८१ सेकंदात शर्यत पूर्ण केली. चारशे मीटर शर्यतीत अमोल जेकबने प्राथमिक फेरीत प्रथम स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली. पुरुषांच्या गोळाफेकीत तेजिदरपाल सिंगने १९.२६ मीटर अंतरावर गोळाफेकीत रौप्यपदक निश्‍चित केले. माजी आशियाई विजेत्या ओमप्रकाश कऱ्हानाला (१८.८०) पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

भारतास ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तेजिंदरसिंग तूर याने गोळाफेकीत रौप्यपदक जिंकून दिले. त्याने १९.२६ मीटर अशी कामगिरी केली. महिलांच्या लांब उडीत नीना वाराकील तिसरी आली. तिने ६.०४ मीटर उडी मारत ब्राँझ जिंकले.