गुजरान यांची ‘वाशी-सातारा’ दौड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - सातारा हिल अर्धमॅरेथॉनचे आयोजन करणाऱ्या संयोजकांना पाठिंबा देण्यासाठी तसेच या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वाशीहून धावत निघालेले सतीश गुजरान गुरुवारी पुण्यात आले. धूम्रपानाच्या व्यसनावर ‘विजय’ मिळविलेल्या गुजरान यांनी या मोहिमेतून ‘नो स्मोकिंग’चाही संदेश दिला आहे.

गुजरान यांनी सांगितले, की मी बुधवारी वाशीहून पहाटे साडेपाच वाजता निघालो. ७३ किमी अंतर धावून मी सायंकाळी ७.३० वाजता लोणावळ्यात पोचलो. त्यानंतर मी गुरुवारी पुण्यात आलो. शुक्रवारी माझा सुरूरमध्ये थांबा असेल. शनिवारी मी साताऱ्यात दाखल होईल. त्यानंतर रविवारी माझा अर्धमॅरेथॉनमध्ये सहभाग असेल.’ कॅप्टन स्वामिनाथन अय्यर त्यांच्याबरोबर सहभागी झाले आहेत. या उपक्रमाची प्रेरणा कशी मिळाली, याविषयी गुजरान म्हणाले, की ‘संदीप काटे हे साताऱ्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी या स्पर्धेच्या संयोजनाला देशात लौकिक मिळवून दिला आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून असंख्य धावपटू येतात. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली.’ गुजरान यांना अलीकडे धावण्याची ‘क्रेझ’ निर्माण झाली, याचे कौतुक वाटते; पण ते म्हणाले, की ‘धावण्यामुळे आरोग्य सुदृढ बनते; पण धावण्याइतके सुदृढ तुम्ही आहात का? तेवढी तुमच्याकडे क्षमता आहे का?’ गुजरान ५२ वर्षांचे आहेत. त्यांनी कॉम्रेड्‌स मॅरेथॉनमध्ये आठ वेळा सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा दहा वेळा पूर्ण करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

Web Title: sports news satish gujran washi to satara running