...तर सीनियर आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धाही भारतातून रद्द होणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयला मिळाले आहे. पाकिस्तानचा समावेश असल्यामुळे आयोजनासाठी बीसीसीआयने केंद्र सरकारकडे विनंती केली आहे. सरकारने कोणताच प्रतिसाद न दिल्यामुळे १९ वर्षांखालील आशियाई करंडकाच्या आयोजनास बीसीसीआयला नुकतेच मुकावे लागलेले आहे.

पुढील वर्षी सीनियर आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. याच करंडकासाठी युवकांची स्पर्धाही यंदा भारतात होणार होती, परंतु पाकिस्तान क्रिकेटने आक्षेप घेतल्यामुळे ही स्पर्धा भारताऐवजी मलेशियाला होणार आहे. युवकांच्या स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही तीन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारकडे विनंती केली होती, परंतु त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर पाकिस्तानने स्पर्धेच्या ठिकाणात बदल करण्याची मागणी केल्यामुळे काहीच करू शकलो नाही, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. ही स्पर्धा द्विपक्षीय मालिका नसून आयसीसीची स्पर्धा आहे. भारत, पाकिस्तानसह आशियातील इतर देशही यात खेळणार आहेत, असे या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. भारत-पाकिस्तानमध्ये कोणतेही द्विपक्षीय सामने होत नसले, तरी परदेशात प्रामुख्याने आयसीसीच्या स्पर्धांत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत.