सिंधू, साईना, श्रीकांत उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

नागपूर - अव्वल मानांकित पी. व्ही. सिंधू, द्वितीय मानांकित साईना नेहवाल, श्रीकांत किदांबी, एच. एस. प्रणॉय या दिग्गज खेळाडूंनी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहता यंदाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनमधील दोन पिढ्यांत विशेषतः महिला विभागात असलेली तफावत प्रकर्षाने समोर आली. या दिग्गज खेळाडूंसमोर उज्ज्वल भविष्य मानली जाणारी दुसरी फळी आपली उपयुक्तता सिद्ध करण्यात अपयशी ठरली.

प्रणॉय आणि पी. कश्‍यप या दोन दिग्गज खेळाडूंत झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत प्रणॉयची सरशी झाली, तर अजय जयरामने लक्ष्य सेनविरुद्ध सामना सोडून दिला. यातही शुभंकर डे याचे यश लक्षवेधी ठरले. त्याने बी. साई प्रणीतचे आव्हान मोडत उपांत्य फेरी गाठली.

मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत ऑलिंपिक आणि जागतिक पदकविजेत्या सिंधू व साईनाने विजयी धडाका लावत लागोपाठ दोन सामने जिंकून आगेकूच केली. उपउपांत्यपूर्वफेरीत महाराष्ट्राच्या रेवती देवस्थळेचे आव्हान २१-१६, २१-२ ने लिलया मोडीत काढणाऱ्या सिंधूने उपांत्यपूर्व लढतीत मध्य प्रदेशच्या श्रियांशी परदेशीला २१-११, २१-१७ असे हरवले. हा सामना ३० मिनिटे चालला. सिंधूने पहिला गेम सहज जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये श्रियांशीने तिला चांगलेच झुंजविले. प्रेक्षकांना चांगल्या रॅलीज पाहायला मिळाल्या. अखेर अनुभवाच्या जोरावर सिंधूने गेम व सामना जिंकत उपांत्य फेरी गाठली.

तेलंगणाच्या जी. वृषालीला २१-१२, २१-१० स्पर्धेबाहेर करणाऱ्या साईनाने उपांत्यपूर्व लढतीत ज्युनियर क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आकर्षी कश्‍यपला २१-१७, २१-१० ने पराभूत केले. 

महिला आणि पुरुष गटातील दिग्गज खेळाडूंच्या लढती लक्षात घेता, त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना खेळविल्याचाच भास जाणवला. पुरुष गटात विजेतेपदासाठी पहिली पसंती असलेल्या अव्वल मानांकित श्रीकांतने आठव्या मानांकित शुभम प्रजापतीला २१-१७, २३-२१ ने पराभूत करून अंतिम चारमध्ये स्थान निश्‍चित केले. त्याअगोदर, त्याने एअर इंडियाच्या आर्यमन टंडनचे आव्हान दोन गेममध्ये मोडीत काढले. पुरुष एकेरीतील सर्वात चुरशीच्या ठरलेल्या सामन्यात शुभंकर डेने तृतीय मानांकित बी. साई प्रणीतला तीन गेम्समध्ये १३-२१, २१-१८, २२-२० ने पराभूत करून उपांत्य फेरीवर शिक्‍कामोर्तब केले. लक्ष्य सेननेही उपांत्य फेरी गाठली. अजय जयरामने दुखापतीमुळे पहिल्या गेममध्येच सामना सोडला. त्यावेळी लक्ष्य १५-१० ने आघाडीवर होता. 

निकाल - महिला - आकार्षी कश्‍यप वि. वि. रेश्‍मा कार्तिक २१-९, ११-२१, २१-२१-१२, अनुरा प्रभुदेसाई वि. वि. तनिष्क एम. २१-२३, २१-१४, २१-१८.

Web Title: sports news sindhu saina & srikant in semifinal