थरार तोच; सरशी सिंधूची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई / सोल - जागतिक स्पर्धेतील मॅरेथॉन अंतिम लढतीच्या आठवणी पी. व्ही. सिंधू आणि नोझोमी ओकुहारा यांच्यातील कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीने नक्कीच जागा झाल्या; पण त्या वेळेसारखे आपल्या चाहत्यांना नाराज व्हावे लागणार नाही, याची खबरदारी घेत सिंधूने ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.

मुंबई / सोल - जागतिक स्पर्धेतील मॅरेथॉन अंतिम लढतीच्या आठवणी पी. व्ही. सिंधू आणि नोझोमी ओकुहारा यांच्यातील कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीने नक्कीच जागा झाल्या; पण त्या वेळेसारखे आपल्या चाहत्यांना नाराज व्हावे लागणार नाही, याची खबरदारी घेत सिंधूने ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.

ग्लास्गोतील जागतिक स्पर्धेची अंतिम लढत एक तास ५० मिनिटे रंगली होती, तर सोलमधील अंतिम लढतीमधील थरार होता एक तास २२ मिनिटांचा. जागतिक स्पर्धेतील एक रॅली ७३ शॉट्‌सपर्यंत रंगली होती, तर या स्पर्धेतील निर्णायक गेममधील एक रॅली ५६ शॉट्‌सची झाली. फरक भारतीयांसाठी सर्वांत महत्त्वाचा होता. त्या वेळी ओकुहारा जिंकली होती, तर या वेळी सिंधू. भारतीय सुपरस्टारने २२-२०, ११-२१, २१-१८ अशी बाजी मारली, ती अखेरची दीर्घ शॉट्‌स चाललेली रॅली जिंकतच.

ग्लास्गोच्या तुलनेत सिंधूला काहीसा उशिरा सूर गवसला. ओकुहाराने पहिल्या गेममध्ये १२-९ आघाडीचे २०-१८ मध्ये रूपांतर केले होते; पण सिंधूने याच वेळी अंतिम टप्प्यातील सहापैकी चार गुण जिंकत आपली तयारी दाखवली. सिंधूने दुसरा गेम सहज गमावला होता; पण या गेममध्ये तिने राखलेली एनर्जीच बहुधा निर्णायक ठरली असावी. 

निर्णायक गेममध्ये सिंधू १५-१३ आणि १८-१६ आघाडीवर असताना दीर्घ रॅलीज झाल्या होत्या. पहिल्या गेममध्ये सिंधूने ४२ शॉट्‌सची रॅली गमावली होती; पण या वेळी तिने प्रथम २८ आणि त्यानंतर ५६ शॉट्‌सची रॅली जिंकली. ही रॅली गमावली असती तर सिंधूची आघाडी एका गुणावर आली असती; पण सिंधूने हेच टाळले होते. 

सिंधूच्या बचावात्मक खेळानेही तज्ज्ञांना प्रभावित केले आहे. ताकदवान शरीरवेधी स्मॅश, ड्रॉप्स ही तिची खासियत. तिचा सूर काहीसा हरपला, तर कमकुवत बचावाचा यापूर्वी प्रतिस्पर्धी फायदा घेत असत; पण कोरियात काहीशी बदललेली सिंधू दिसली. ओकुहाराही तिचा बचावात्मक बॅकहॅंड क्रॉसकोर्ट शॉट्‌स पाहून काहीशी अवाक झाली. ओकुहारास नेटजवळही चकमकीतही पुरेसे यश सिंधूने दिले नाही. दोनदा, तर ओकुहाराने मारलेले शटल नेटच्या वरच्या पट्टीला लागून परत गेले.

काँग्रॅट्‌स पी. व्ही. सिंधू, कोरिया सुपर सीरिज विजेतेपदाबद्दल अभिनंदन. भारतास तुझ्या कामगिरीचा अभिमान वाटतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

तू लढलीस; पण तुझा विश्‍वास कायम होता. अखेर तू प्रत्येक देशवासीयांसाठी प्रेरणा ठरलीस. या विजयास कसलीही तोड नाही. काँग्रॅट्‌स सिंधू.- सचिन तेंडुलकर

आपण हे करू शकतो यावर तिचा विश्‍वास होता. तिने ते करून दाखवले. काँग्रॅट्‌स सिंधू. आम्हा भारतीयांना तुझा अभिमान आहे.- विजेंदरसिंग

सिंधूने काय जबरदस्त खेळ केला. कोरिया सुपर सीरिज विजेतेपदाबद्दल अभिनंदन. भारतीयांना तुझा अभिमान आहे. तुझी यशोमालिका अशीच कायम राहो.
- राज्यवर्धन राठोड, केंद्रीय क्रीडामंत्री

येsssss अखेर तिने करून दाखवले. पी. व्ही. सिंधूने कोरिया सुपर सीरिज जिंकले. पराभवाचा गोड वचपा काढला.- अमिताभ बच्चन

सिंधू २०१७ मध्ये
जानेवारी - सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रां प्रि गोल्ड स्पर्धेत विजेती
एप्रिल - इंडिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद
एप्रिल - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी
ऑगस्ट - जागतिक स्पर्धेत रौप्यपदक
सप्टेंबर - कोरिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद