विराट कोहली फुटबॉलसम्राट मेस्सीपेक्षा श्रीमंत

पीटीआय
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली - फलंदाजीतील सातत्य आणि नेतृत्वातील सातत्यपूर्ण यशामुळे सध्या चढत्या आलेखावर स्वार असलेल्या विराट कोहलीवर लक्ष्मीचाही वरदहस्त प्रभावीपणे कार्यरत आहे. जगभरातील सर्वांत श्रीमंत खेळाडूंच्या फोर्बसने जाहीर केलेल्या यादीत विराटने फुटबॉलसम्राट लिओनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे.

नवी दिल्ली - फलंदाजीतील सातत्य आणि नेतृत्वातील सातत्यपूर्ण यशामुळे सध्या चढत्या आलेखावर स्वार असलेल्या विराट कोहलीवर लक्ष्मीचाही वरदहस्त प्रभावीपणे कार्यरत आहे. जगभरातील सर्वांत श्रीमंत खेळाडूंच्या फोर्बसने जाहीर केलेल्या यादीत विराटने फुटबॉलसम्राट लिओनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे.

२८ वर्षीय विराट कोहलीचे नाणे केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर ब्रॅंड व्हॅल्यूच्या मैदानावरही तेवढेच वाजत आहे. फोर्बसने जगभरातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यात विराट कोहली १ कोटी ४५ लाख डॉलरच्या उत्पन्नासह सातव्या स्थानी आहे, तर लिओनेल मेस्सी १ कोटी ३५ लाख डॉलरसह नवव्या क्रमांकावर आहे.

कसोटी असो की एकदिवसीय क्रिकेट विराट कोहलीची बॅट धावांचा पाऊस पाडत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील मुंबईत झालेल्या सामन्यात त्याने ३१ वे शतक केले. वन डेमध्ये सर्वाधिक शतकांच्या शर्यतीत आता त्याच्यापुढे केवळ सचिन तेंडुलकरच आहे. पुण्यातील सामन्यात विराटने २९ धावा केल्या. त्याचबरोबर यंदाच्या वर्षात एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत त्याने हाशिम आमलाला मागे टाकले.

फोर्बसच्या या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत टेनिससम्राट रॉजर फेडरर ३ कोटी ७२ लाख डॉलरसह पहिल्या स्थानी आहे. मेस्सीचा फुटबॉलमधील प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोने मात्र चौथा क्रमांक मिळवलेला आहे. पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीत विराट कोहली हा जगभरातील एकमेव क्रिकेटपटू आहे.

पहिले दहा श्रीमंत खेळाडू  (डॉलरमध्ये)
१) रॉजर फेडरर (३ कोटी ७२ लाख), 
२) लेब्रोन जेम्स (३ कोटी ३४ लाख), 
३) उसेन बोल्ट (२ कोटी ७ लाख), 
४) ख्रिस्तियानो रोनाल्डो (२ कोटी १५ लाख), 
५) फिल मिकेलसन (१ कोटी ६ लाख), 
६) टायगर वूडस्‌ (१ कोटी ६६ लाख), 
७) विराट कोहली (१ कोटी ४५ लाख), 
८) रॉरी मॅक्‍लोरी (१ कोटी ३६ लाख), 
९) लिओनेल मेस्सी (१ कोटी ३५ लाख), 
१०) स्टेफ कुरी (१ कोटी ३४ लाख)